अकोला : लाडकी बहीण योजनेवरून अजितदादांवर अप्रत्यक्षपणे शरसंधान करू पाहणाऱ्या शिंदे गटावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रहार केला. बॅनरवरील फोटोवरून बोलणाऱ्या शंभूराज देसाई यांनी तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादीवरील वक्तव्यावेळी भूमिका का मांडली नाही असा सवाल मिटकरी यांनी केला. लाडकी बहीण योजनेच्या फोटोवरून काही चुकीचं झालं असेल तर त्यात नक्कीच दुरुस्ती करता येईल. मात्र, या मुद्द्यावरून महायुतीत भांडण लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये असा टोला यावेळी आमदार मिटकरी यांनी लगावलाय.
मंत्री शंभूराज देसाईंच्या टीकेवर उत्तर देताना अमोल मिटकरी म्हणाले की, जनसन्मान यात्रा ही आमच्या पक्षाची यात्रा आहे. या यात्रेत आम्ही आमच्याच पक्षाची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत नेणार आणि मांडणार. या यात्रेत लाडकी बहीण योजनेचा आम्ही प्रचार करत असतो. यावर माहितीतील इतर घटक पक्षांना आक्षेप घेण्याचं काय काम? या मुद्द्यावर बोलणाऱ्या शंभूराज देसाई यांनी तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावेळी आपली भूमिका का मांडली नाही. महायुतीत समन्वय ठेवायची जबाबदारी फक्त एकट्या राष्ट्रवादीची नाही.
अजितदादांची भूमिका ही पक्षाची भूमिका
अजित पवारांनी दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाल की, अजितदादांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. त्यावर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलण्याची गरज नाही. लोकसभेत आम्ही लवचिक भूमिका घेतली. आता विधानसभेत अजितदादांनी जी मागणी केली आहे त्याकडे महायुतीने लक्ष द्यावं. जागा वाटपातील आकड्यांपेक्षा जिंकणाऱ्या जागांवर आमचा फोकस आहे.
सोशल मीडियावर भूमिका मांडू नये
रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकरांच्या नावाला विरोध केल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, रूपाली चाकणकर यांच्याबद्दल काल रूपाली ठोंबरे यांनी भूमिका मांडली. पण असं न करता या मुद्द्यांवर पक्षांतर्गत व्यासपीठावर चर्चा केली जावी. पक्षातील कुणीही सामाजिक माध्यमांच्या व्यासपीठावर पक्षांतर्गत प्रश्नांची चर्चा करू नये. या संदर्भात पक्षाचे प्रदेश नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल.
ही बातमी वाचा :
अधिक पाहा..