प्रताप नाईक, झी मीडिया
Kolhapur Crime News: कोल्हापूरात एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. महिन्याभरापूर्वी कोल्हापुरात अघोरी प्रकार घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेने पतीला सोडचिठ्ठी द्यावी, म्हणून हा अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरमधल्या स्मशानभूमीत हा अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे.
कोल्हापुरात अंधश्रद्धेमुळे स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अघोरी प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळेच पुरोगामी म्हणून असणारी जिल्ह्याची ओळख आता पुसट होताना पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील कुर परिसरात स्मशानभूमीमध्ये एक अघोरी प्रकार उघडकीस आलाय. एका महिलेने आपल्या पतीपासून ‘सोडचिठ्ठी’ देऊन वेगळं व्हावं आणि आणखी तिघांचे आयुष्य उद्ध्व्स्त होण्यासाठी हा अघोरी प्रकार केला गेल्याचा संशय आहे.
भुदरगड तालुक्यातील कुर गावात एका नागरिकाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत तयारी सुरू होती. काही मंडळी साफसफाईसाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांना बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि हाताने लिहिलेला कागद मिळून आला. त्यावेळी तिथे एक कागददेखील सापडला. हा कागद उघडून वाचला असता त्यावर एका महिलेचे नाव नमूद करुन सोडचिठ्ठी द्यावी असा मजकूर लिहलेला आहे.
तसंच, त्या चिठ्ठीत आणखी तिघांची नावं लिहून त्यांच्या आयुष्याची भट्टी लागवी म्हणजेच वाट लावावी असेही लिहिलं होतं. दरम्यान अशा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या प्रकारामुळं गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसंच, संतापाची लाटदेखील गावकऱ्यांमध्ये पसरली आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्ती आणि त्यामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कोल्हापुरात खळबळ
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीदेखील कोल्हापुरात असाच एक प्रकार उघडकीस आला होता. कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही. पण गेल्या काही वर्षात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.