वाशिम: एकीकडे आम्हाला सत्तेत या म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे काहीही करून बच्चू कडूला (Bachchu Kadu) पाडा असा आदेश द्यायचा हे काही बरोबर नाही, मी बावनकुळेंना (Chandrashekhar Bawankule) सांगतो, एक नाही तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडू पडणारन नाही असा थेट इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. वाशिममध्ये एका दिव्यांग मेळाव्याला आले असताना बच्चू कडू यांनी भाजपला हा इशारा दिला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी त्यांना साथ दिली होती. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू मंत्री होते, शिंदेंनीही त्यांना मंत्रीपद देतो असं आश्वासन दिलं होतं. पण रखडलेल्या मंत्रिमंडळाच्य विस्तारामुळे बच्चू कडूंना अद्याप मंत्रीपद मिळालं नाही. त्यावर या आधीही बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यानंतर त्यांनी भाजपला थेट इशाराच दिला आहे. 

Bachchu Kadu On BJP : भाजपला थेट इशारा 

अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांच्याविरोधात भाजपने जोरदार तयारी सुरू केली असल्याची चर्चा आहे. कोणत्याही परिस्थिती अचलपूरचा आमदार हा भाजपचाच असला पाहिजे या दृष्टीने भाजपने गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू केला आहे. पण बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतरही या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचं लपून राहिलं नाही. 

बच्चू कडूंना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्याच्या भाजपच्या रणनीतीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “एकीकडे आम्हाला सांगायचं की सत्तेमध्ये या आणि दुसरीकडे मित्रत्व पाळायचं नाही हे असं भाजपचं सुरू आहे. काही करून बच्चू कडू पडला पाहिजे यासाठी हालचाली सुरू आहेत. आपण यासंबंधी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सांगितलं होतं की खासदार अनिल बोंडे यांच्याकडे लभ द्या म्हणून. आता मी त्यांना सांगतो, एक नव्हे तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही.”

भाजप त्रास देत असल्याचा आरोप 

आमदार बच्चू कडूं यांनी मंगळवारी अकोल्यात बोलताना भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप बच्चू कडूंनी भाजपवर केला आहे. आपल्या मतदारसंघात काँग्रेस आणि इतर पक्षांचा आपल्याला त्रास नाही. मात्र, भाजपचं आपल्याला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप कडूंनी भाजपवर केला. मात्र आपण त्याची काळजी करत नसल्याचं बच्चू कडूंनी ठणकावले आहे.  

ही बातमी वाचा: 

 



Source link