Akola Crime News: अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण (Congress MLA from Akola West Sajid Khan Pathan) यांच्यासह अन्य एकाविरुद्ध यवतमाळ (Yavatmal Police) पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यवतमाळ शहरातील अवधुतवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आमदार साजिद खान पठाण (Sajid Khan Pathan)) यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम आणि त्याच्या नातेवाईकांशी संबंध असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, दाऊद इब्राहीम आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावानं धमकी देण्यात आल्याचा आरोपही या तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. त्यामुळं आमदार पठाण यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. दरम्यान, सैय्यद खलील सैय्यद नैनू असं तक्रारकर्त्या व्यक्तीचं नाव असून ते यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील रहिवासी आहेत.
या संदर्भातच एक ऑडिओ क्लिप देखील वायरल होत आहे. एका महिलेला धमकी मिळाली असल्याची आपबीती मांडत असल्याचं या ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत आहे. मात्र ‘एबीपी माझा’ या ऑडिओ क्लिप’ची पुष्टी करत नाही. ही तक्रार सध्या यवतमाळ पोलिसांनी चौकशीत ठेवली आहे. सध्या, यासंदर्भात आमदार साजिद खान पठाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते सध्या नागपूरला अधिवेशनासाठी गेले असल्याची माहिती मिळत आहे.
काय आहे प्रकरण?
अकोला शहरातील अकोटफैल भागातल्या अकबर प्लॉट येथील रिजवाना खतीब हिचा विवाह यवतमाळ येथील मेमन कॉलनीतील आझाद बेग यांच्याशी झाला. मात्र, तिच्यात आणि पतीत कौटुंबिक कलह सुरू असल्यानं ती गेल्या तीन वर्षांपासून माहेरी अकोला इथेच राहते. रिझवानाची लहान बहीण शबाना हिनं आझाद बेग यांचा मामेभाऊ असलेल्या दारव्हा येथील सय्यद खलील सय्यद नैनू या व्यक्तीला फोन केला. फोनवर तिनं अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्याशी आमचे पारवरिक संबंध आहेत, असं सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरूनच आपली बहीण रिजवाना ही यवतमाळला तिच्या पतीच्या घरी आली आहे. हे घर तिचंच आहे आणि तिला घरातून कोणीच बाहेर काढू शकत नाही, असं तिने खलील यांना सांगितलं. साजिद खान पठाण यांनी आपले संबंध दाऊद इब्राहिम आणि त्यांची बहीण हसीना पारकर यांच्याशी असल्याचं सांगितल्याचंही सय्यद खलील यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
या प्रकरणात रिजवानाची मदत करण्यासाठी लवकरच दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर स्वतः यवतमाळला येऊन या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं शबानानं आपल्याला सांगितल्याचं सय्यद खलील यांनी तक्रारीत म्हटलं आहे. यासोबतच आझाद बेग यांची पत्नी रिजवाना हिनं स्वतः आपल्याला तिचे नातेवाईक साजिद खान पठाण यांचे दाऊद आणि हसीना पारकर यांच्याशी जवळचे संबंध असल्याचं म्हटलं आहे, असं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे.
दरम्यान, साजिद खान पठाण यांचे दाऊद आणि हसीना पारकर यांच्याशी असलेले संबंध हे देश विघातक असल्याचं लक्षात आल्यावर आपण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही तक्रार करत असल्याचं सय्यद खलील यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी यवतमाळमधील अवधुतवाडी प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
अधिक पाहा..