अकोला : शरद पवार गटात असलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीकाटिपणी होत आहे. आता या वादात राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उडी घेत अमोल कोल्हेंच्या अजित पवारांवरील टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. अजितदादांवर टीका करणाऱ्या खासदार कोल्हेंनी थोडे बारामती आणि काटेवाडीत चक्कर मारून पाहावं. मग त्यांना अजितदादांचा विकास दिसेल. कोण सर्कशीतला आणि कोण जंगलातला हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत साऱ्यांना ठाऊक आहे. तेव्हा कृपा करून दादांवर बोलताना थोडं सबुरीने घ्या. अजितदादांमुळेच सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेना संघर्ष यात्रा काढावी लागलीये. अजितदादांनी या दोघांनाही कामाला लावलं असल्याचा टोला देखील यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला.
देशात विकासाचा वादा अजित दादा – अमोल मिटकरी
कोल्हे साहेब आपल्यासारख्या अतिसामान्य माणसाला शिरूरमध्ये निवडणूक लढवायला लावले. तिथे वाघ बनवणाऱ्या अजित दादांवर ज्यावेळेस काटेवाडी मध्ये जाऊन तुम्ही सर्कशीतील वाघाशी त्यांची तुलना करण्याचा प्रयत्न करत आहात. तेव्हा खरंच आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्व आणि उत्तुंग बुद्धिमत्तेवर मला हसावसं वाटतंय. ज्या काठेवाडीत तुम्ही उभे आहात त्या सुनेत्रा वहिनी पवार यांनी त्या काटेवाडीचे नेतृत्व केलं आहे. जाताना जरा बारामतीचे नवीन एसटी स्टँड पण बघा. कोण सर्कशीतलं, कोण जंगलातील वाघ आहे. दिल्लीपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे. या देशात विकासाचा वादा अजित दादा आहेत.” या शब्दात मिटकरी यांनी खासदार कोल्हेंना ठणकावले आहे.
दादांनी तुम्हाला कामाला लावलंय
चार वर्षे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात कधीच प्रगट झाला नाहीत. पण आपल्याला आणि सन्माननीय वंदनीय सुप्रिया ताईंना दोन्ही खासदारांना मिळून जर संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळ-पळ पळावे लागत असेल, तर हेच दादाच वेगळेपण आहे. दादांनी तुम्हाला कामाला लावलंय. तेव्हा कृपा करून दादांवर बोलताना थोडं सबुरीने घ्या. बोलतांना जरा सांभाळून बोला. नाहीतर आपल्या बाबतीत महाराष्ट्राचा तरुण जो विचार करत आहेत, तुम्ही दादांवर जर अशा पद्धतीने बोलाल तर राज्यातील तरुण कदाचित हे खपवून घेणार नाही. बारामतीमधील लोकं फार हुशार आहेत. त्यांना हे सगळं माहीत आहे की, येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे. अजितदादा हाच विकासाचा वादा आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका. असा सल्लाही मिटकरी यांनी अमोल कोल्हेंना दिला.