IPF MahaHelpline : इराण – इस्त्रालय युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने UAE मधील अमेरिकेच्या लष्करी तळावंर हल्ले केले आहेत. हजारो भारतीय नागरीक दुबईत अडकले आहेत. दुबईत राहणारा एक मराठमोळा उद्योजक दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांनाच्या मदतीसाठी धावून आला आहे. एका मोठ्या ग्रुपच्या माधय्मातून मराठी पर्यटकांना मदत केली जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

दुबईमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी प्रवासी  समुदायाला मदत करण्यासाठी  IPF MahaHelpline ही सेवा सुरू करण्यात आली आहे.  सध्या इराण–अमेरिका संघर्षामुळे निर्माण झालेल्या प्रवासातील अडचणींमुळे  दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी विशेष हेल्पलाईन म्हणून सक्रिय करण्यात आली आहे. ही हेल्पलाईन सुरू झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात 1200 हून अधिक प्रवाशांनी मदत मागितली आहे. दुबई येथून या उपक्रमाचे नेतृत्व करणारे राहुल तुळपुळे यांनी ही माहिती दिली.

पाच शहरांमध्ये मदतकार्य

महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने सुरू असलेली IPF MahaHelpline (+971 50 365 4357) ही सेवा दुबईमधील पाच शहरांमध्ये कार्यरत असलेल्या 20 हून अधिक स्वयंसेवकांच्या पथकाद्वारे २४ तास चालवली जात आहे. अडकलेल्या प्रवाशांना हॉटेल मुक्काम वाढविणे, अन्न व औषधे उपलब्ध करून देणे, तात्पुरती निवासव्यवस्था, वाहतूक सुविधा तसेच दूतावासाशी समन्वय अशा विविध प्रकारची मदत केली जात आहे. याशिवाय, स्थानिक डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक प्रिस्क्रिप्शन मिळवून अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र वैद्यकीय सहाय्य पथकही कार्यरत आहे, ज्यामुळे प्रवाशांचे सुरू असलेले उपचार खंडित होऊ नयेत याची काळजी घेतली जात आहे.

हेल्पलाईनचे पथक दुबईतील भारतीय दूतावासाच्या संपर्कात

हेल्पलाईनचे पथक दुबईतील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे.  भारतीय राजदूत आणि कॉन्सुल जनरल यांच्याकडून नियमित माहिती घेतली जात आहे. सर्व अपडेट्स दुबईत अडकलेल्या प्रवाशांपर्यंत पोहचवले जात आहेत.  2 ते 6 मार्च या कालावधीत  दुबईतील विविध विमानतळांवरून तसेच ओमानमधील मस्कत येथून उपलब्ध उड्डाणांद्वारे 500 हून अधिक प्रवासी सुखरूप भारतात परतले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दुबई येथील भारतीय कॉन्सुल जनरल तसेच IPF MahaHelpline च्या व्यवस्थापन पथकाशी सातत्याने संपर्क साधत आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रसाद पाटील हे हेल्पलाईनचे वाहतूक समन्वयक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली फुजैराह आणि मस्कतसारख्या पर्यायी प्रस्थान केंद्रांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच नीलम नांदेडकर आणि श्वेता करंदीकर यांच्या नेतृत्वाखालील प्राधान्य सहाय्य पथक लहान मुले, अर्भके आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या कुटुंबांना विशेष मदत पुरवत आहे.

हवाई क्षेत्रातील अडथळ्यांमुळे IndiGo, SpiceJet आणि Air India या भारतीय विमान कंपन्यांची अनेक उड्डाणे रद्द झाल्यानंतर, राहुल तुळपुळे (प्रमुख – IPF MahaHelpline) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 400 हून अधिक प्रभावित प्रवाशांची यादी तयार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्री. रवींद्र चव्हाण हे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, अडकलेल्या मराठी प्रवाशांना मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. त्यानंतर ही यादी कॉन्सुलेटमार्फत संबंधित विमान कंपन्यांना पाठविण्यात आली असून, उपलब्ध आसने आणि उड्डाणांच्या स्लॉटमध्ये या प्रवाशांना प्राधान्य देऊन त्यांचे लवकरात लवकर भारतात पनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उड्डाणांची संख्या हळूहळू वाढत असल्याने, पुढील काही दिवसांत जास्तीत जास्त प्रवाशांना मायदेशी परत पाठवण्यासाठी हेल्पलाईनचे पथक महाराष्ट्र शासन, दुबईतील भारतीय कॉन्सुल जनरल कार्यालय, विमान कंपन्या आणि चार्टर ऑपरेटर्स यांच्यासोबत जवळून काम करत आहे, अशी माहिती राहुल तुळपुळे यांनी दिली. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp