अकोला : जिल्ह्यात गेल्या 24 तांसात अपघाताच्या (Accident) तीन घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. सुदैवाने पहिल्या दोन अपघाताच्या घटनांमध्ये जिवीतहानी झाली नव्हती. मात्र, आज दुपारी झालेल्या दोन दुचाकींच्या धडकेत तीन जणांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा-बेलखेड मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी असून त्यास तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दोन दुचाकीवरुन चारजण प्रवास करत होते, मात्र तेल्हारा-बेलखेड मार्गवर आल्यानंतर दोन्ही दुचाकींची समोरा-समोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एका दुचाकीचा भुगा झाल्याचं रस्त्यावर पडलेल्या वस्तूंवरुन दिसून येत आहे. अपघातील मृतांमध्ये दोन तरुणी आणि एका महिलेचा समावेश आहे. तर, जखमीला तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेतील मृत दोन्ही तरूणी एकाच कुटूंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनं गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
पातुरमध्ये ट्रक व कारचा अपघात
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात भरधाव येणाऱ्या ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मतदकार्य सुरू केले होते. त्यानंतर, पोलिसांनीही (Police) घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.
तांदुळ घेऊन जाणारा ट्रक पुलावर कोसळला
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी फाट्यावरील एका नदीच्या पुलावरून दोन्ही वाहनं जात असताना भीषण अपघात झाला, शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. नदीवरील पूल छोटा असल्यामुळे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कारवर पलटी झाला. अरुंद रस्त्यावरुन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् शेजारुन जात असलेल्या कारवर हा तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कोसळला. या अपघातात ट्रक खाली कार दबल्या गेल्यानं कारमधील प्रवासी वाहनात अडकले होते. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुदैवानं या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसून कारमधील 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत. चान्नी फाट्यावरील अरुंद पुलावरच ट्रक कोसळल्याने ट्रकमधील तांदुळाचे पोते पुलाखाली पडले आहेत. तर, ट्रक शेजारुन जाणारी कार ट्रकच्या ओझ्याखाली दबल्याने तिचे मोठे नुकसान झालं आहे.
अधिक पाहा..