मुंबई : राज्यात एकीकडे ठाकरें बंधुच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून राजकीय चक्रं फिरवून शिवसेना-मनसे युतीला ब्रेक लावला जाण्याची शक्यता दिसून येत आहे. कारण, मुंबईत आज (12 जून) सकाळी एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. आता, या भेटीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. 

राज्यातले विविध पक्षांचे नेते काही मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात, महाराष्ट्राची अशी संस्कृती राहिली आहे. आम्हीही विरोधी पक्षात होतो तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आपल्या कामासाठी भेटत होतो, असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अधिकचं बोलणं टाळलं. अजित पवार सध्या महायुतीतील प्रमुख राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे, राज ठाकरे महायुतीत सोबत येणार का, याच अनुषंगाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे अजित पवारांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी अधिकचं बोलणं टाळलं.  

राज ठाकरेंना आजही आमची ऑफर – शिरसाट

राज ठाकरेंच्या भेटीला निश्चित राजकीय अर्थ असतात. मात्र, ते जेव्हा भेटतात तेव्हा काही सूचना देखील करतात. त्यामुळे, महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आजच्या भेटीवर बोलणं, त्याचा अर्थ काढणं हे गैर आहे. जे काही होईल ते लवकरच आपल्याला समजेल, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. तर, यापूर्वी देखील आम्ही राज ठाकरेंना ऑफर दिली होती, आजही आमची ऑफर आहे, असेही शिरसाट यांनी म्हटलं. 

भाव कितीही वाढवले तरी दारु पिणारे पितातच

दरम्यान, राज्यातील उत्पादन शुल्क विभागाकडून दारुच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने कर वाढवल्याने दारुचे भाव वाढले आहेत. त्यासंदर्भातील प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर, दारुचे भाव कितीही वाढवले तरी पिणारे दारू पितातच, अशी मिश्कील प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. 

बच्चू कडूंच्या आंदोलनावर चर्चा सुरू

बच्चू कडू यांच्या आंदोलनावरही अजित पवारांनी भाष्य केलं. कोणताही प्रश्न हा चर्चेने सुटतो, त्यांच्याशी चर्चा करायला राज्य सरकार तयार आहे. या संदर्भात सरकार आणि प्रशासन नियमित त्यांच्या संपर्कात आहे, असे ते म्हणाले. तसेच, योग्यवेळी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करू, असेही अजित पवारांनी म्हटले. तर, या देशात कायदा आणि संविधान आहे, अशा पद्धतीने कुणी कायदा हातात घेण्याची भाषा करू शकत नाही, असे म्हणत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या वक्तव्यावरुन एकप्रकारे इशाराच दिला.

अजित पवार ऑन खत आणि बियाणे लिंकिंग 

खतं आणि बियाणे लिंकिंग करणाऱ्या दुकानदार आणि कंपन्यांना सरकार सोडणार नाही. शेतकऱ्यांना लुटू पाहणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल, दुकानदारांवर परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशाराच अजित पवारांनी खतं दुकानदारांना दिला आहे.  

हेही वाचा

राज ठाकरे-फडणवीसांची भेट आटोपताच चक्रं फिरली, आता मनसेचा बडा नेता उदय सामंतांच्या भेटीला

आणखी वाचा



Source link