अमरावती : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या (Ram Temple Ayodhya) मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. मात्र या सोहळ्याला चारही शंकराचार्यांनी विरोध केला आहे. असे असतानादेखील केवळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यातून होणाऱ्या राजकीय फायद्यासाठी भाजप (BJP) राम मंदिराचा इव्हेंट करत आहे. मुळात मंदिराचे काम अजून पूर्ण व्हायचे आहे. मग मंदिर लोकार्पण सोहळ्याची इतकी घाई का, असा प्रश्न काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपला विचारला आहे. भाजप आणि आरएसएसकडून राम मंदिराच्या अक्षदा वाटप केल्या जात आहे. जसे काही यांनीच मंदिर बांधले आहे. हे म्हणजे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’, अशा सारखे आहे. असा टोला देखील विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला आहे. 

‘जो नौ साल कुछ नहींं किया काम, अब वो बोलते जय श्रीराम’

अयोध्येतील राममंदिराचा हा पवित्र सोहळा संपूर्ण देशासाठी त्यांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. मात्र भाजप आणि संघ परिवाराकडून या सोहळ्याच्या निमित्याने राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिर अद्याप पूर्ण झालेले नाही. शिवाय हिंदू धर्मियांतील पूजनीय अशा चारही शंकराचार्यांनी मंदिराच्या सोहळ्यानिमिती विरोध दर्शवत, कार्यक्रमाला न जाण्याचे जाहीर केले आहे. हा सोहळा केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी केला जात आहे, हे उघड आहे. म्हणजे ‘जो नौ साल कुछ नहींं किया काम, अब बो बोलते जय श्रीराम’ असा खोचक टोला देखील विजय वडेट्टीवारांनी भाजपला लगावला आहे. 

2014 आणि 2019 ची पुनरावृत्ती होऊ नये

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना तीन वेळा तारीख देऊन वेळ मागून घेतला. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळाले पाहिजे. ही आमची आग्रही भूमिका आहे. आरक्षण देताना घाईघाईत कुठलाही निर्णय होता कामा नये. सोबतच कुठल्याही समाजाचे यात नुकसान करता कामा नये. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागता काम नये. याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही न्यायालयात ते टिकू शकेल असे ते आरक्षण असायला हवे. नाही तर मग केवळ निवडणूक आहे म्हणून थातुरमातुर आरक्षण देऊ आणि निवडणूक झाल्या की त्यांना वाऱ्यावर सोडू हे सरकारचे धोरण असायला नको. ओबीसींंचे नुकसान करून मराठा समाजाला फायदा होईल किंवा मराठा समाजाचे नुकसान करून ओबीसीला फायदा होईल, असे सरकारने करू नये इतकीच आमची मागणी आहे. 2014 आणि 2019 ला निवडणुकांच्या तोंडावर सरकारने जे केलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

वंचितबाबत निर्णय अंतिम टप्प्यात

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष इंडिया आघाडीत असायला हवा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. याबाबत बैठक अंतिम टप्प्यात असून येत्या 25 तारखेला मुंबईत बैठक आहे. त्यानंतर इंडिया आघाडीला कळवले जाईल. या बाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे चर्चा करत असल्याचे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.  

ही बातमी वाचा: 



Source link