Eknath Shinde Meet Amit Shah: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच फोडाफोडीचं राजकारण सुरु असून यावरुनच शिंदे गट आणि भाजपामध्ये मंगळवारी नाराजीनाट्य घडलं. निवडणुकीआधी कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीवरुन राजकारण तापलेलं असतानाच अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन शिंदेंनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान शिंदेंनी थेट नाव घेऊन महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची तक्रार अमित शाहांकडे केली. या व्यक्तीमुळेच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदेंनी सांगितल्याचं समजतं. खास बाब म्हणजे ही व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांपैकी एकही नाही. शिंदेंनी नेमकी कोणाविरुद्ध आणि काय तक्रार केलीये याचा तपशील समोर आलाय.
नाराजी नाट्य काय? मुख्यमंत्र्यांबद्दलही शिंदे सेनेत नाराजी
शिवसेनेनेच्या महायुतीमध्ये महत्वाचा घटक पक्ष असूनही पक्षाची, मंत्र्यांची कोंडी केली जात असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता असून उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे आम्हालाही गृहत धरु नका असा संदेश देण्यासाठीच शिवसेना मंत्र्यांनी मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावल्याबद्दल शिवसेनेते नाराजी आहे.
शिंदेंनी अमित शाहांकडे कोणाची तक्रार केली?
शिंदेंनी बुधवारी सायंकाळी जवळपास 50 मिनिटे अमित शाहांशी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. यावेळी शिंदेंनी शहा यांच्याकडे राज्यातील भाजप नेत्यांच्या विरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याची तीव्र प्रतिक्रिया महायुतीमध्ये उमटली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेही जास्त न ताणता नमते घेण्याची भूमिका घेत प्रकरणावर पडदा टाकला. मात्र असं असलं तरी अमित शाहांच्या भेटीदरम्यान एकनाथ शिंदेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात तक्रार करताना गंभीर आरोप केल्याचे समजते.
भाजपचे काही नेते जाणीवपूर्वकपणे…
चव्हाण हे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पैसे देऊन फोडत असल्याची तक्रार शिंदेंनी केली आहे. निवडणुकांमध्ये महायुतीला पोषक वातावरण असताना भाजपचे काही नेते जाणीवपूर्वक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून विरोधकांना आयते कोलित मिळत असल्याचे शिंदे यांनी शहा यांच्या निदर्शनास आणून दिले. भाजप नेत्यांच्या गोंधळामुळे महायुतीत उगाचच बिघाडी होत असल्याचेही शिंदे यांनी सांगितल्याचे समजते.
एकमेकांवर टीका टाळली पाहिजे
विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युतीसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. मात्र काही नेते ते वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याने मीडीयात नाहक उलटसुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे जनमानसात उगाचच संभ्रम निर्माण होत आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. युतीच्या विजयी घोडदौडीत त्यामुळे विनाकारण अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही नेते वैयक्तिक स्वार्थापोटी काम करत आहेत त्यांच्याकडून अशा पध्दतीने काम यापुढे होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. तसेच युतीतल्या नेत्यांनी एकमेकांवर टीका टाळली पाहिजे. भाष्य करताना प्रत्येकाने संयमाची आणि सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे, असं शिंदेंनी अमित शाहांशी झालेल्या चर्चेत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.