Koregaon Park Land Controversy : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ करणाऱ्या आणि पवार कुटुंबाला हादरा देणाऱ्या कोरेगाव भूखंड गैरव्यवहार प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांकडून होणारे आरोप, नवनवीन खुलासे आणि समोर येणारी नावं या साऱ्यांदरम्यानच ‘झी 24तास’नं ही मोठी बातमी दाखवल्यानंतर अवघ्या 48 तासांच्या आत कोरेगाव पार्कातील जमीन खरेदी व्यवहार रद्द करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं. या संपूर्ण प्रकरणात अद्यापही कैक प्रश्न उपस्थित होत असून, आता खुद्द (Sharad Pawar) शरद पवार यांनीसुद्धा त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली आहे.
अकोला इथं माध्यमांशी संवाद साधत असलाना राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेते अशी ओळख असणाऱ्या पवारांना त्यांचे नातू पार्थ पवार यांचं नाव गोवलं गेलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाती प्रश्न विचारला असता, ‘पार्थवर गुन्हा का नाही, हे मुख्यमंत्रीच सांगतिल’ असं सूचक विधान केलं.
काय म्हणाले शरद पवार?
जिथं सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांवरील होणाऱ्या आरोपांवर दिलेल्या प्रतिक्रियेनं अनेक प्रश्न उपस्थित झाले, त्याचसंदर्भात प्रश्न केला असता, आपल्या कुटुंबाची विचारधारा एक असून प्रशासकीय आणि कौटुंबीक गोष्टी वेगळ्या आहेत असं सांगताना ‘सुप्रियाचं मत तिचं वैयक्तीक असू शकतं’ असं पवारांनी स्पष्ट केलं.
सदर प्रकरण आणि त्यात समोर आलेल्या गोष्टी या गंभीर असून, त्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे. त्यामुळं पार्थ प्रकरणात चौकशी करून मत समाजासमोर ठेवलं पाहिजे. जमीन गैरव्यवहार प्रकरणात सत्य समाजासमोर आलं पाहिजे आणि . पार्थवर गुन्हा का नाही मुख्यमंत्रीच सांगतील…, असं शरद पवार म्हणाले.
इथं शरद पवारांनी या प्ररकरणावरील प्रतिक्रिया देण्यापूर्वी शुक्रवार, 7 नोव्हेंबर 2025 रोजी अजित पवार यांनी माध्यमांना कोरेगाव प्रकरणी माहिती देत हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली. याचदरम्यान कोरेगाव जमीन प्रकरणावर पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न विचारला असता, ‘कोणी कोणाची फसवणूक केली, याची चौकशी होईल. कोणी सांगितल्यामुळं हे घडलं, कोणाचे फोन गेले, कोणाकडून या प्रकरणात दबाव आणला होता? आणला होता तर कोणी आणला होता? याबाबतची चौकशी होईल,’ असं म्हणत हा व्यवहार झाल्याचं आपल्याला ठाऊक नव्हतं, ठाऊक असतं तर आपत त्याबाबतच सांगितलं असतं असं ते माध्यमांना उद्देशून सांगत ‘जे काही असेल ते नियमानुसार करा’ याचाच त्यांनी पुनरुच्चार केला.