Pune News Today: पुण्यातील बोपदेव घाट परिसरात काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर होता. बोपदेव घाटातील सामूहिक अत्याचारानंतर पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊलं उचलली आहेत. सुरक्षेसाठी तब्बल 70 कोटीं रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
पुण्यातील बोपदेव घाट परिसरात नुकत्याच घडलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील टेकड्यांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे पोलिसांनी पुढाकार घेऊन शहरातील 22 टेकड्यांना हायटेक सुरक्षा यंत्रणेने सज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाकडून यासाठी 70 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कसा असेल हा हायटेक प्रकल्प?
-हाय रिझोल्यूशन आयपी-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे
-थेट नियंत्रण कक्षाशी जोडणी
-पॅनिक बटण (भोंगा) – तातडीची सूचना दिली जाईल
-आयपी स्पीकर्सद्वारे सूचना प्रसारित
-फ्लडलाइट्स – रात्रीच्या वेळी सुरक्षेसाठी
-भूमिगत फायबर इंटरनेट व वीज लाईन
पुण्यातील कोणत्या टेकड्या असणार?
वेताळ टेकडी, पर्वती, चतुःशृंगी, तळजाई, लॉ कॉलेज टेकडी, सेनापती बापट रस्ता, पाषाण, बोपदेव घाट आदी एकूण 22 ठिकाणांवर प्रकल्प राबविला जाणार आहे.
बोपदेव घाट परिसरात युद्धपातळीवर सुरक्षेचे काम सुरू असून इतर ठिकाणीही लवकरच काम सुरू होणार आहे. या निर्णयामुळे व्यायामासाठी, फेरफटक्यासाठी किंवा ट्रेकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांचा आत्मविश्वास वाढेल आणि महिला सुरक्षेला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काय आहे बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण?
पुण्यातील बोपदेव घाटात 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती. बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोएब बाबू शेख आणि चंदकुमार रविप्रसाद कनोजिया यांना पोलिसांनी अटक केली होती.
FAQ
Q.बोपदेव घाट कुठे आहे?
Ans: बोपदेव घाट हा महाराष्ट्रातील पुणे व सासवड शहरांच्यामधील छोटा घाट आहे.
Q. बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण कधी घडलं होतं?
Ans:पुण्यातील बोपदेव घाटात 3 ऑक्टोबर 2024 रोजी 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती.
Q. टेकड्यांवर कोणती सुरक्षा उपाययोजना राबवणार?
Ans:हाय रिझोल्यूशन आयपी-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे