Pune Crime News : पुणे शहर हे विद्येचे माहेर घर मानले जाते. हजारो तरुण तरुणी शिक्षणानिमित्ताने पुण्यात शिक्षणासाठी येतात. अनेक विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात. होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन पुण्यात राडा झाला आहे. एका महिलेने या संशयिताच्या कानाला चावा घेतला आहे.
पुण्यातील होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन होस्टेलचालक आणि त्याच्या सुनेने एका व्यक्तीला मारहाण केली. या सुनेने त्याच्या कानाचा चावा घेतला. यात त्याच्या कानाला पाच टाके बसलेत. संबंधित व्यक्तीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात होस्टेलचालकासह महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जेवण झाल्यानंतर मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना होस्टेल मधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन होस्टेलचालक आणि त्याच्या सुनेने तरुणाला मारहाण केली. सुनेने कानाचा चावा इतका जोरात घेतला की त्याच्या कानावर पाच टाके घालावे लागले.
याबाबत मिलिंद वसंत कोठारी (वय ४०, रा. दत्त वसाहत, दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर, शिरोळे रोड, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुरेश विठ्ठल कांबळे (वय ६०) व त्यांची सुन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद कोठारी हे ड्रायव्हर म्हणून नोकरी करतात. सोमवारी दुपारी ते जेवण करुन घराबाहेर उभे असणारे मित्र अभिजित जाधव, अमित खेंगरे यांच्याबरोबर गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे लोकमान्य गर्ल्स होस्टेल चालविणारे सुरेश विठ्ठल कांबळे आणि त्यांची सुन आले. कांबळे यांनी तुम्ही मुलींना का छेडता असे म्हणून फिर्यादी यांच्याशी भांडायला लागले.
तेव्हा फिर्यादी यांनी आम्ही त्यांना छेडत नाही. आम्ही गप्पा मारत उभे आहोत, असे म्हणाले. त्यावर त्यांनी व त्यांच्या सुनेने त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्या झटापटीत त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या उजव्या कानाचा जोरात चावा घेऊन जखमी केली. त्यांच्या पोटाला दोन ठिकाणी कटरसारख्या धारदार हत्याराने मारले. मिलिंद कोठारी यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या कानाला पाच टाके घालण्यात आले तर पोटावर दोन्ही ठिकाणी दोन दोन टाके घालावे लागले. डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी तपास करीत आहेत.