Mumbai Best Election Result Money Connection: बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक सध्या राज्याच्या राजकारणामधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतोय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं युती करुन लढवलेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधू सपशेल अपयशी ठरल्याचं दिसत आहे. या दोघांना निवडणुकीतील 21 पैकी एकही जागा जिंकता आलेली नाही. या पराभवासहीत ठाकरेंनी पतपेढीवरील 9 वर्षांपासूनची सत्ता गमावली आहे. या निवडणुकीमध्ये शशांक राव आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकल्यानंतर ही निवडणूक पैशांच्या जोरावर जिंकल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

कोणी आणि काय आरोप केलाय?

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपा आणि शशांक राव यांच्याविरोधात उमेदवार दिलेले बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत यांनी गंभीर आरोप केले आहेत. पराभव झाल्यानंतर सामंत यांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वापरण्यात आल्याचा आरोप केला आहे. “बेस्ट पतपेढीचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये आमचा पराभव झाला पण जे जिंकले त्यांचं अभिनंदन! आता तुम्ही म्हणाल की हे कसं झालं? 12 हजार कर्मचारी माझ्यासोबत असताना आमचा पराभव झाला,” असं सामंत यांनी पराभवानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलंय.

पैशाचा ओघ पाहायला मिळाला

“प्रचंड पैशाचा ओघमागील आठवड्याभरापासून पाहायला मिळाला. आम्हाला वाटलं की कर्मचारी पैसे घेतील मात्र मतदान आम्हाला करतील. पैशाच्या समोर आम्ही कमी पडलो,” असं सामंत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही त्या निवडणुकीत जिंकलेले ‘ते’ 21 जण कोण? ही घ्या संपूर्ण यादी

पराभवाची कारण काय?

निवडणुकीतील पराभवाची कारणं काय आहेत याबद्दलही सामंत बोलले आहेत. “बेस्ट वाचण्यासाठी मी प्रयत्न केले. भाजपने पैसा लावला आपल्या अधिकाराचा वापर केला. आम्ही कॉन्टॅक्ट करण्यामध्ये आणि पैसा लावण्यामध्ये कमी पडलो,” असंही सामंत यांनी म्हटलं आहे.

‘मला आश्चर्य वाटतं की भाजपासारखा…’

“मला आश्चर्य वाटतं की भाजपसारखा पक्ष एका पतपेढीच्या निवडणुकीला एवढी सगळी यंत्रणा लावतो. जे त्यांना हवे त्यासाठी हे सगळं करतात यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल आणि लोकांना सांगावं लागेल की ही भीती सुद्धा आहे,” असं सूचक विधान सामंत यांनी केलं आहे.

नक्की वाचा >> ‘‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर…’; भाजपाने उडवली एकही जागा न जिंकणाऱ्या ठाकरे बंधूंची खिल्ली

निवडणुकीचा निकाल काय लागला?

बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक 14 जागा तर भाजपच्या 7 जागा निवडून आल्या. ठाकरे बंधुच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. बेस्ट पतपेढीतील 9 वर्षाची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेने गमावली.

FAQ

बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल काय लागला?
बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या सहकार समृद्धी पॅनलने 14 जागा जिंकल्या, तर भाजपच्या प्रसाद लाड यांच्या पॅनलने 7 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनलला 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. ठाकरे गटाने गेल्या 9 वर्षांपासून असलेली पतपेढीवरील सत्ता गमावली.

निवडणुकीत पैशाच्या प्रभावाबाबत कोणता आरोप झाला आहे?
बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष आणि उत्कर्ष पॅनलचे नेते सुहास सामंत यांनी शशांक राव आणि भाजपच्या पॅनलवर निवडणूक पैशाच्या जोरावर जिंकल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितलं की, मागील आठवड्याभरात प्रचंड पैशाचा ओघ दिसून आला, आणि कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले तरी ठाकरे गटाला मतदान करतील असं वाटलं होतं, पण पैशाच्या प्रभावासमोर ते कमी पडले.

सुहास सामंत यांनी भाजपबाबत काय सूचक विधान केलं?
सुहास सामंत यांनी म्हटलं, “मला आश्चर्य वाटतं की भाजपसारखा पक्ष एका पतपेढीच्या निवडणुकीला एवढी सगळी यंत्रणा लावतो. जे त्यांना हवं त्यासाठी ते सगळं करतात, यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल आणि लोकांना सांगावं लागेल की ही भीती सुद्धा आहे.”

सुहास सामंत यांनी निकालाबाबत काय प्रतिक्रिया दिली?
सामंत यांनी पराभव स्वीकारत जिंकलेल्यांचं अभिनंदन केलं, पण त्याचवेळी विचारलं, “बारा हजार कर्मचारी माझ्यासोबत असताना आमचा पराभव कसा झाला?” त्यांनी पराभवाचं मुख्य कारण पैशाचा प्रचंड वापर असल्याचं सांगितलं आणि कर्मचाऱ्यांनी पैसे घेतले तरी आपल्याला मतदान करतील असा विश्वास होता, पण तसं झालं नाही, असं नमूद केलं.

निवडणुकीचं राजकीय महत्त्व काय होतं?
बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने ती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली गेली. ठाकरे बंधूंची युती ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांच्या प्रभावाची चाचपणी मानली गेली. त्यांचा पराभव हा राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे, तर शशांक राव आणि भाजपच्या विजयाने त्यांचं वर्चस्व दिसून आलं.

 





Source link