अकोला: गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी पाच आरोपींना पकडण्यात अखेर अकोला (Akola) पोलिसांना यश आले आहे. विशेष बाब म्हणजे या दरोडेखोरांवर पोलिसांनी 25 हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी या आरोपींना पकडण्यात यश आले आहे. 30 डिसेंबरच्या रात्री अकोल जिल्ह्यातील (Akola District) उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली होती. पकडण्यात आलेले पाच आरोपी परिसरात शिकारीसाठी फिरत असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे.
गस्तीवर असलेल्या पोलिसांवर केला होता गोळीबार
अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत 30 डिसेंबरच्या रात्री पोलिसांचे गस्ती पथक फिरत होते. दरम्यान त्यांना काही व्यक्ति दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरतांना आढळले. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपींना हटकल्यावर या आरोपींना पळ काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला असता त्यांनी अचानक पोलीस पथकाच्या दिशेन गोळीबार सुरू केला. यात पोलीसांच्या वाहनावर नऊ गोळ्या झाडल्याचे निशान होते. या गोळीबारात पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले. तर या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. घटनेनंतर पोलीस पथकाने आरोपींचा पाठलाग केला, मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
आरोपींवर होते 25 हजारांचं बक्षीस
या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत आरोपींचा शोध सुरू केला. मात्र काही केल्या या आरोपींचा पत्ता पोलिसांना लागत नव्हता. परिणामी, या आरोपींची माहिती अथवा पकडून देणाऱ्याला पोलिसांकडून 25 हजारांचं इनाम जाहीर केले होते. अखेर 15 दिवसानंतर या आरोपींचा शोध घेण्यात अकोला पोलिसांना यश आले आहे. पकडण्यात आलेले आरोपी शिकार करण्यासाठी फिरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या आरोपींचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
हे आहेत आरोपी
अश्विन गणेश मुंडे, वय 21 वर्ष, राहणार नखेगाव, भावेश उर्फ अर्जुन रवींद्र मुंडाले, वय 19 वर्ष, राहणार : हातरूण, सागर ज्ञानेश्वर चौके, वय 25 वर्ष, राहणार : नेरधामणा अविनाश भिमराव मुंडाळे, वय 25 वर्ष, राहणार : नखेगाव योगेश रामराव मुंडाळे, वय 26 वर्ष, राहणार : नखेगाव असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.