Chandrakant Patil On Bachchu Kadu :  महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यामध्ये जागावाटपावर चर्चा सुरु आहे. अशातच प्रहार जनशक्‍ती पक्षाने (Prahar Janshakti Party) अमरावती मतदारसंघावर दावा ठोकलाय. आम्ही सध्या कुणाच्याही बाजूने नाही, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे बच्चू कडू (Bachchu Kadu) महायुतीमधून बाहेर पडणार का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, या चर्चेला भाजप नेते, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फेटाळून लावले आहे. बच्चू कडू कुटुंबात असलेल्या हट्टी मुलासारखे असल्याची टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

आमदार बच्चू कडू हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. यावर मंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावतीत दौऱ्यावर असतांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, बच्चू कडू नाराज नाहीत, एखाद्या कुटुंबात जो मुलगा हट्ट करतो पण मुलगा शिस्ती बाहेर जाणार नाही. बच्चू कडू हे महायुतीतुन बाहेर पडणार नाही. विरोधक मनातले मांडे खात आहे असं त्यांनी म्हटले.  

मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्नावर सरकारवर नाराजीदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. 

बच्चू कडू काय म्हणाले होते?

बच्चू कडू यांनी बुधवारी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले की, आम्ही सध्या कोणाच्याही (महायुती, महाविकास आघाडी) बाजूने नाही. काही मुद्दे आणि पक्षाच्या धोरणाप्रमाणे आम्ही आपली राजकीय भूमिका निश्चित करणार आहोत. मी कुणाच्या बाजूने हे कोडं आहे आणि ते व्यवस्थितपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रहारची राजकीय मजबुती जिथे होईल तिकडे आम्ही जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले. हो मी राजकीय मोलभाव ( बार्गेनिंग ) करतो आहे आणि ते आम्ही व्यवस्थित करू. लोकसभाऐवजी आम्हाला विधानसभेत जास्त जागा हव्या आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले.  

बच्चू कडूंची नवनीत राणांनाही ऑफर 

बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्याशिवाय नवनीत राणा यांनाही ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. इतर पक्षाचे तेवढे नाहीत. म्हणून अमरावती लोकसभेची जागा प्रहारला मिळाली पाहिजे. एकतर अमरावतीची जागा प्रहारला मिळावी. नाहीतर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. त्यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र एबीपी माझाच्या माध्यमातून मी त्यांना ही ऑफर देत आहे.



Source link