Akola News अकोलामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (12th Board Exam) बुधवारपासून सुरुवात झाली. परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागाने सर्वत्र चोख बंदोबस्त करून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्व उपाययोजना केल्याचा दावा केला असला तरी, कॉपी बहाद्दर नवनवीन युक्त्या शोधून कॉपी केल्याचे प्रकार घडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार अकोला (Akola) जिल्ह्यातील पातुर (Patur) शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूल इथं बारावीच्या परीक्षा केंद्रावर घडला आहे.

यात चक्क भावाने पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर रुबाबाने आपल्या बहिणीला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचं सॅल्यूट करतानाच हे बिंग फुटलं (Exam Cheating Copy Case) आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे (24, रा. पांगरा बंदी) असं या तोतया पोलिसांचं नाव आहे.

सॅल्यूट करताच फुटलं बिंग

इयत्ता बारावीच्या परीक्षांना बुधवार 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. तर त्यानंतर 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने परीक्षेची तयारी सुरू केली असली तरी, यंदा जिल्हा प्रशासनापुढे कॉपीमुक्त परीक्षेचे आव्हान असणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यात 25 हजार 873 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. जिल्ह्याच्या 87 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. पातुरच्या शाहाबाबु हायस्कुलच्या परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थींचा भाऊ अनुपम खंडारे हा कॉपी पुरवण्यासाठी थेट पोलीसाचा गणवेश परिधान करून तोतया पोलीस बनला.

त्यानंतर बहिणीला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रावर इकडे तिकडे फिरू लागला. तेवढ्यात पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या ताफ्यासह या परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी पोहचले असता, तोतया पोलिसाची एकच तारांबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहता तोतया अनुपमनं त्यांना सॅल्यूट ठोकला. परंतु पोलिसांनी त्याचा सॅल्यूट पाहून त्याच्यावर संशय आला. तसेच त्याने घातलेला गणवेश, त्यावरील नेम प्लेट चुकीची असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

तोतया पोलीसाविरुद्ध गुन्हा दाखल  

पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी तोतया पोलीस असलेल्या अनुपमला अधिक विचारपुस केली असता, हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. पोलिसांनी त्याची चौकशी आणि झडती घेतली असता त्याच्या जवळ इंग्रजी विषयाची चिटोरे सापडून आले आणि सत्य समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी अनुपम विरोधात 417, 419, 170, 171 आणि अधिनियम 1982 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पातूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

Nagpur News : रस्त्यांची कामे ठरताय डोकेदुखी, वाहतूक कोंडीचा फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना

अधिक पाहा..



Source link