Beed Sarpanch Murder: बीडच्या सरपंच हत्येचे आज विधीमंडळात पडसाद उमटले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात विरोधकांनी प्रश्नांची राळ उठवली.त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत, कडक कारवाईचं आश्वासन दिलं. या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं. याबद्दल जाणून घेऊया. 

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.आता आठवडा उलटल्यानंतरही हत्याप्रकरणावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विधीमंडळात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेत. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. अजितदादा गटाचा तालुकाध्यक्ष यात सहभागी असून यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईची मागणी केली. 

दानवेंच्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे. एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, अशी माहीती दिली.आरोपी कुठल्या पक्षाचा आहे, कुणाशी संबंधित आहे याचा विचार न करता कारवाई होईल.कुणालाही सोडणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडसह राज्यभरात याची चर्चा झाली. लोकनियुक्त संरपचांची अशी कशी हत्या होऊ शकते? असं म्हणत लोकप्रतिनिधीसह सर्वसामान्यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले. 

सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबरला भर दुपारी अपहरण करून हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणात खंडणीला विरोध केला म्हणून हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हत्येनंतर बीडसह राज्यभरात पडसाद उमटले. केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह सात जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. तीन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आले असून इतर आरोपींचा तपास सुरू आहे. 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात पेटल्याचं पाहायला मिळालं.विधानपरिषदेतही सरकारला थेट प्रश्न विचारत आरोपीच्या राजकीय कनेक्शनवरूनही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत.आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कारवाईला वेग येणार का, हे पाहणं महत्त्वाचंय.





Source link