अकोला –  अकोल्यातील मूर्तिजापूरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तुकाराम बिरकड (Tukaram Birkad) यांचं काल अपघाती निधन झालं. काल (गुरुवारी, ता-14) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. तुकाराम बिरकड (Tukaram Birkad) यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघातात तुकाराम बिरकड (Tukaram Birkad)  यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात मालवाहू टाटा वाहनाने बिरकड यांच्या दुचाकी वाहनाला दिलेल्या जबरदस्त धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारांसाठी स्थानिक खासगी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं. धडक देणारे मालवाहू वाहन हे गुरांची वाहतूक करत असल्याने काही पोलिस त्या वाहनाचा पाठलाग करत होते. तेव्हा या वाहनचालकाने आपले वाहन वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच हा दुर्दैवी अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यातबरोबर या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.

कसा घडला अपघात?

अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या अमरावती विभागातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक होती. या बैठकीला पाच ही जिल्ह्यातील सुमारे 800 कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके देखील उपस्थित होते. माजी आमदार तुकाराम बिरकड हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीसाठी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. भेटीनंतर दुचाकीवरून परत जात असताना जनावरे वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत तुकाराम बिरकड यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी यांचा देखील जागीच मृत्यू झाला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा सहकारी हरपला – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्ट लिहून तुकाराम बिरकड यांच्या निधनानंतर पोस्ट लिहली आहे. ‘विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं विदर्भाचा कर्तृत्ववान सुपुत्र, चळवळीत काम करणारा सच्चा कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा सहकारी हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो’.

‘माजी आमदार तुकाराम बिरकड हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, विदर्भाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं नेतृत्व होतं. तीन महिन्यापूर्वी झालेल्या अपघातातून ते नुकतेच सावरले होते. शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला सुध्दा ते उपस्थित होते. मात्र पुन्हा एकदा अपघातानंच त्यांचा बळी घेतला, ही घटना अत्यंत क्लेशकारक आहे. त्यांचं अकाली निधन हा राष्ट्रवादी परिवारासाठी मोठा धक्का आहे’.

अधिक पाहा..





Source link