Amravati Crime: अमरावती जिल्ह्यातील विर्शी गावात एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. शारदा बाभुळकर या महिलेवर तीन पुरुष आणि एका महिलेने मिळून बेदम हल्ला केल्याची माहिती समोर आली असून, संबंधितांचा मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Amravati Crime News)

नेमकं काय घडलं?

विर्शी गावात जागेच्या वादातून हा वाद निर्माण झाला. याच वादातून शारदा बाभुळकर यांना आरोपींनी रस्त्यावरच पकडून मारहाण केली. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक महिला काठीने शारदा यांना मारहाण करत आहे, तर अन्य तीन पुरुषांनी त्यांच्या केसाला धरून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. काही क्षण शारदा यांना हालचालही करता आली नाही.

व्हिडिओ आला समोर, गुन्हा दाखल

घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे पोलिसांवर कारवाईचा दबाव निर्माण झाला. वलगाव पोलीस स्टेशनने तत्काळ हालचाली सुरू केल्या. शारदा बाभुळकर यांच्या फिर्यादीवरून संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कायदेशीर कारवाई सुरू

वलगाव पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. पीडित महिलेला प्राथमिक उपचार देण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपींना लवकरच ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे विर्शी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांनी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नांदेडमधून तरुणांनी उचलून नेलेली मुलगी अखेर सापडली

नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या अपहरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची दखल घेत नांदेड पोलिसांनी (Nanded Police) तात्काळ तपास सुरू केला आणि त्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात यश मिळवले.

पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली मुलगी रेल्वे स्टेशन परिसरातच वास्तव्यास असून, ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. 

आणखी वाचा



Source link