Maharashtra Politics : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतावदी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केले आहे. भारत पाक यांच्यात युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारत पाक युद्धजन्य परिस्थिती निवळ्यानंतर महाराष्ट्रात राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडणार आहे.
युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर दोन राष्ट्रवादीचे मनोमिलन होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक असल्याचे जाणवते. आता शरद पवारांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी ही माहिती दिली.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिका सध्या वेगळ्या आहेत. त्यांच्या संबंधात कटुता कुठेही जाणवत नाही. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच आहे. ते एकत्र यावेत यासाठी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्यानंतर आता माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनीही तोच सूर आळवला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी ओझरती चर्चा झाली आहे. तसेच उप मुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या मतदारसंघातील कामा बाबत सकारात्मक आहेत. त्यांच्याकडून कोणतीही आड काठी होत नाही. ते सकारात्मक संकेत देत आहेत. तर आपणही तशी भूमिका घ्यावी असे आमच्या वरिष्ठांना सांगितले आहे. युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर कदाचित याबाबत आमदारांची बैठक होऊन याबाबत निर्णय होईल अशी माहिती आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहेत. अशातच आता राष्ट्रवादीत सध्या विलीनीकरणाचे वारे सुरु आहेत का ?…राष्ट्रवादी (SP) पक्षातील एक गट अजित पवारांसोबत जाणार का अशा चर्चा सुरु झाल्यात.. याला निमित्त ठरलंय शरद पवारांचं मोठं वक्तव्य… आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याबाबत माहिती दिलीय… इंडिया आघाडीच्या सद्य स्थितीवरही पवारांनी भाष्य केलंय.. तसंच संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं असं सूचक वक्तव्य पवारांनी या मुलाखतीत केलंय… पवारांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे सुरु झालेत का अशा चर्चा रंगल्यात.