Lok Sabha Election 2024 Phase 2 अकोला : अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 88 जागांसाठी सुमारे 15.88 कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदानाचा रणसंग्राम रंगणार आहे. अशातच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात (Akola) देखील सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झालीये. मतदारांनी आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली असून उन्हाचा तडाखा लक्षात घेता सकाळच्या सत्रात मतदान करण्यास मतदारांनी अधिक पसंती दिली आहे.
परंतु, असे असताना मतदार यादीती घोळ अद्याप कायम असल्याने अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काही मतदारांना आपले नाव मतदान यादीत आढळून न आल्याने, आल्या पावली माघारी जावं लागलंय. मात्र, या गोंधळाचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे वंचितच्या (Vanchit Bahujan Aghadi) मतदारांची नावे जाणीवपूर्वक मतदार यादीतून गहाळ केल्याचा गंभीर आरोप या मतदारांकडून करण्यात येतोय.
जाणीवपूर्वक मतदार यादीतून नाव गहाळ केल्याचा आरोप
विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदान केन्द्रावर आज मतदानाची रणधुमाळी रंगात आहे. अशातच अकोल्यात सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झालीये. गेल्या काही दिवसांपासून आकोल्याती तापमानाने कमालीचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे उन्हाची दाहकता लक्षात घेता मतदारांनी सकाळच्या सुमारास मतदान केंद्रांवर मोठी गर्दी करत आपला हक्क बाजवण्याला पसंती दिली आहे. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर मतदार यादीत नाव नसल्याने मतदारांना आल्या पावली माघारी जावं लागतंय.
अकोल्यातील कृषीनगर भागातील मतदान केंद्रांवर हा घोळ मोठ्या प्रमाणात दिसतोय. सकाळपासून शेकडो मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाला मुकले आहेत. कृषीनगर भागातच वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकराचं निवासस्थान असून हा भाग त्यांचा गड समजला जातो. परिणामी, वंचितच्या मतदारांची नाव जाणीवपूर्वक मतदार यादीतून गहाळ केल्याचा गंभीर आरोप या मतदारांनी केलाय. त्यामुळे मतदारयादीतील घोळ सलग दुसऱ्या टप्प्यातील निवडनुकांमध्ये कायम असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
ईव्हीएम मशीन बंद पडल्याने गोंधळ
वाशिम शहरातील बाकलीवाल विद्यालयामधील असलेल्या बूथ क्रमांक 243 या मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये जवळ जवळ 20 ते 25 मिनिटे मतदान प्रक्रिया बंद होती. त्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला असून मतदान केंद्र निरीक्षकाला तक्रार करून वेळ का लागत आहे, असा जाब मतदारांनी विचारला. शेवटी बॅटरी बदलण्यात आल्यावर आता मशीन सुरू झालीये. मात्र काहीकाळ मशीन बंद झाल्याने एकच गोंधळ त्या ठिकाणी झाल्याचे बघायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..