प्रणव पोळेकर, तुषार तपासे, झी मीडिया : महाराष्ट्र ही नवरत्नांची खाण आहे… यातलंच एक रत्न आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनदलितांचा उद्धार केला. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. त्यांनी फक्त एका जातीसमुहाचा उद्धार केला असं नाही. गावगाड्यातल्या प्रत्येक घटकासाठी त्यांनी केलेलं कार्य अमूल्य आहे. महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. समाजाचा प्रेरणास्तंभ म्हणून त्यांच्या कार्याकडं पाहिलं जातं. कोट्यवधी लोकांची कुळं उद्धरणा-या या महामानवाचं मूळ गाव कोणतं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू गावातला असला तरी त्यांचं मूळ गाव कोकणात आहे. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे महामानवाचं मूळ गाव.
बाबासाहेबांचा गाव
आंबडवे गाव, कोकणातल्या कोणत्याही सामान्य गावाप्रमाणं हे गाव आहे. गावात कौलारु साधी घरं पाहायला मिळतात. शेसव्वाशे उंब-याचं गाव बाबासाहेबांचं मूळ सांगतं. आंबडवे गावात आजही बाबासाहेबांची भावकी नांदते. बाबासाहेब जगभरासाठी आंबेडकर म्हणून ओळखले जात असले तरी या गावात त्यांच्या नावामागं वेगळं आडनाव आहे. बाबासाहेबांचं मूळ आडनावही वेगळं आहे. बाबासाहेबांचं मूळ आडनाव सकपाळ आहे. बाबासाहेबांचे भावकीतले नातू पणतू आजही इथं बाबासाहेबांचा वारसा अभिमानानं सांगतात.
बाबासाहेबांचे आजोबा
बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सकपाळ हे आंबडवे गावात राहायचे त्यांची हयात याच गावात गेली. सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचा जन्म 1848 साली झाला. रामजीबाबा 1866 साली ब्रिटीशांच्या पलटणीत नोकरीवर रुजू झाले. बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ यांनी नोकरीधंद्याच्या निमित्तानं आंबडवे गाव सोडलं… नोकरीनिमित्त ते मध्य प्रदेशातील महू, सातारा असं फिरत राहिले.
रामजीबाबांनी गावची नाळ कधीच तुटू दिली नाही. आंबडवे गावात आज जिथं बाबासाहेबांचं स्मारक आहे तिथं बाबासाहेबांचं कोकणी पद्धतीचं कौलारु घर होतं अशी आठवण स्थानिक सांगतात. मातीच्या भींती, लाकडाचे वासे आणि गवताचं छप्पर असं मूळ घराचं स्वरुप होतं.
बाबासाहेबांचा जन्म कुठे?
बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू गावात झाला. पुढं बाबासाहेबांच्या कुटुंबाचं सातारा आणि मुंबईत वास्तव्य होतं. पण या काळातही मुलांना आंबडवे गावात वर्षातून दोन वेळा तरी न्यायचच असा रामजीबाबांचा प्रयत्न असायचा. त्याकाळी आंबडवे गावी जाणं हे सोपं नव्हतं. आंबडवे गावात येण्यासाठी मुंबई ते दाभोळ बंदर असं होडीनं येत होते. रत्नागिरीपासून दापोली आणि दापोलीतल्या कॅम्पातल्या घरी रामजीबाबा आणि बाबासाहेबांचा मुक्काम असायचा. दापोलीतही रामजीबाबांनी घर बांधलं होतं. पण तिथं त्यांचं फारसं मन रमत नव्हतं. सुट्ट्यांच्या काळात आंबडवे गावात जाण्याचे वेध लागत होते.
दापोलीतून आंबडवे गावात येण्यासाठी रस्ता नव्हता. त्या काळी एसटी किंवा दुसरं काही साधन नव्हतं. त्यामुळं रामजीबाबांचा कुटुंबकबिला बैलगाडीतून गावी येत असे. दापोली ते आंबडवे हे अंतर तब्बल 61 किलोमीटर होतं. एवढं मोठं अंतर एका दिवसात बैलगाडीत कापणं शक्य नव्हतं. मग ते रस्त्यात पालवणे गावात परिचितांकडं त्यांचा मुक्काम असायचा त्यानंतरच ते आंबडवे गावात पोहचत असंत.
रामजीबाबांबाबत एक अतिशय महत्वाची गोष्ट माहिती समोर आलीय. सुभेदार रामजीबाबा यांच्या संत कबीरांचा मोठा प्रभाव होता. कबीरांची विचारसरणी त्यांना अतिशय आवडत होती. त्यामुळंच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली होती. कोकणी माणूस मासे मटण खाणार नाही असं होणार नाही. पण कबीर पंथाची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी शाकाहार स्वीकारला होता.
बाबासाहेबांचे शिक्षण
बाबासाहेब आंबेडकर आंबडवे गावात पाचवी ते नववीत शिकत असतानाच दोन एक वेळा आल्याचं गावकरी सांगतात. चैत्र पौर्णिमेला भवानीदेवीची पूजा असायची त्यासाठी बाबासाहेब लहानपणी गावी यायचेच असं गावकरी सांगतात. बाबासाहेब आंबेडकरांचे वडीलबंधू आनंदराज आंबेडकर यांचं लग्नकार्य गावातील भावकीसोबत व्हावं अशी रामजीबाबांची इच्छा होती. त्यानुसार आंबवडे गावाजवळच्या गोमेंडी गावातली मुलगी आनंदराज आंबेडकरांसाठी पाहिली होती. त्या लग्नावेळी बाबासाहेब नववीत शिकत होते. त्या लग्नाला बाबासाहेब भावंडांसह आले होते.
बाबासाहेबांचा छंद
बाबासाहेबांना लहानपणापासून पुस्तकं वाचण्याचा खूप छंद होता याचा एक किस्सा गावात अजूनही सांगितला जातो. मोठे भाऊ आनंदराज यांच्या लग्नासाठी बाबासाहेब आले होते. त्यावेळी ते पुस्तक घेऊन गावाजवळच्या जंगलातील देवीच्या देवळात गेले. लग्नासाठी वरात निघण्याची वेळ आली. पण नवरदेवाचे भाऊ असलेल्या बाबासाहेबांचा पत्ता नव्हता…गावात शोधाशोध झाली. शेवटी बाबासाहेब मंदिरात पुस्तक वाचत असल्याची माहिती मिळाली. बाबासाहेब सापडले तेव्हा वरात नवरीच्या गावाकडं गेली.
बाबासाहेबांचं समाजकारण
बाबासाहेब समाजकारणात जसे व्यस्त झाले तसं या घराकडं त्यांचं दुर्लक्ष झालं. अगदी स्वातंत्र्यानंतरच्या काळातही आंबडवे गावातलं त्यांचं कौलारु घर अस्तित्वात होतं अशा आठवणी जुनेजाणते सांगतात. पण पुढं त्या घराच्या देखभालीकडं दुर्लक्ष झाल्यानं ते घर जीर्ण होत गेल्याचं गावकरी सांगतात. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर आंबडवे गावातल्या बाबासाहेबांच्या राहत्या घराचं स्मारक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. सुरुवातीला दोन वास्तू बांधण्यात आल्या होत्या. एका वास्तूत बाबासाहेबांचा अस्थिकलश आणि दुसरी बुद्धविहाराची वास्तू होती. सुरुवातीच्या काळातली स्मारकं अतिशय छोट्या स्वरुपात होती.
बाबासाहेबांच्या आंबडवे गावात आज बाबासाहेबांचं स्मारक आहे. या विहारात बाबासाहेबांचा अस्थिकलश आपल्याला पाहायला मिळतो… बाबासाहेबांच्या मूळ गावाच्या शोधात हजारो भीमअनुयायी या गावात येतात. बाबासाहेबांचं मूळ ज्या गावात आहे… बालपणी ज्या गावात बाबासाहेबांचे पाय लागले होते ते गाव तीर्थस्थळापेक्षा कमी नाही… बाबासाहेबांच्या मूळ गावात त्यांच्या कार्याला साजेसं स्मारक असावं असं स्थानिकांना वाटतं.
गावाशी आजही नातं
बाबासाहेबांच्या कुटुंबानं आजही त्यांच्या आंबडवे गावाशी नाळ तोडलेली नाही. आंबडवे गावातील आपल्या कुटुंबकबिल्याशी आंबेडकर कुटुंब संपर्क साधून आहेत. आंबेडकरांनी आपल्या सहा एकर जमिनीवर आंब्याची बाग फुलवलीये. एक घरही बांधलंय. त्या घराकडं आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर संपर्क साधून असल्याचं गावकरी सांगतात.
बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव जरी आंबडवे असलं तरी त्यांचा जन्म हा काही आंबडवे गावातला नाही. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891रोजी मध्य प्रदेशातल्या महू गावात झाला… रामजीबाबा हे लष्करातल्या नोकरीत होते. 1889 ते 1894 या काळात त्यांची नेमणूक महू गावी असताना बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेब तीन वर्ष महू गावात राहिले. बाबासाहेबांचा जन्म ज्या लष्करानं दिलेल्या घरात झाला त्याचा शोध 1971 साली घेण्यात आला. भंते धर्मशील यांनी बाबासाहेबांच्या जन्मगावी उचित स्मारक बांधण्याचा संकल्प सोडला. 2008 साली सध्याचं जे स्मारक आहे ते मूर्तस्वरुपात आलं.
आंबेडकर नाही तर ‘हे’ खरं आडनाव
याच घरापासून काही पावलं अंतरावर असलेल्या राजे प्रतापसिंह हायस्कूलमध्ये 7 नोव्हेंबर 1900मध्ये बाबासाहेबांनी प्रवेश घेतला. बाबासाहेबांचं मूळ आडनाव सकपाळ असतानाही गावाचं नाव लावावं म्हणून भीमराव आंबवडेकर असं नाव शाळेच्या मस्टरवर लिहिण्यात आलं. पण आंबवडेकर हे आडनाव उच्चारण्यासाठी थोडं आडंनिडं वाटत असल्यानं शाळेतलेच एक शिक्षक कृष्णा आंबेडकरांनी त्यांचं आंबेडकर हे आडनाव लावण्यास सूचवलं… त्या दिवसापासून भीमराव सकपाळ आंबवडेकर, भीमराव आंबेडकर झाले. 1904मध्ये बाबासाहेबांनी चौथीची परीक्षा पास केली. त्यानंतर बाबासाहेब मुंबईला
मुंबईपर्यंतचा प्रवास
साता-यातून पुढं बाबासाहेब कुटुंबासह परळमधील बीआयटी चाळीत येऊन राहू लागले. मुंबईतली ती चाळ अजूनही बाबासाहेबांच्या आठवणी स्वतःच्या अंगाखांद्यावर वागवतेय…. चाळीतली खोली क्रमांक 50 आणि 51 या दोन खोल्यांमध्ये बाबासाहेबांचा संसार सुरु होता. बाबासाहेब एका खोलीचा वापर अभ्यासासाठी करत होते. तर दुस-या खोलीचा वापर स्वयंपाकासाठी होत होता. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाचे अनेक टप्प्यांच्या साक्षीदार या दोन खोल्या होत्या. बाबासाहेब 1934पर्यंत या खोलीत वास्तव्यास होते.
बाबासाहेबांचं शिक्षण
दरम्यानच्या काळात 1916 मध्ये बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला. तिथं ते जवळपास दोन वर्ष वास्तव्य करुन होते. ऑक्टोबर 1917पर्यंत ते लंडनमधील 10 किंग हेन्री रोड लंडन या पत्यावर राहत होते. 1917 साली त्यांना भारतात परतावं लागलं. उर्वरित शिक्षण पुढच्या चार वर्षांच्या काळात पूर्ण करण्याची परवानगी घेऊन ते भारतात आले होते. त्यांनी पुन्हा 1920 साली अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडन गाठलं.
बाबासाहेब या काळात मुंबईत परळच्याच दोन खोल्यांच्या घरात राहत होते. 1930 साली त्यांनी स्वतः वेगळं घर बांधण्याचा विचार केला. बाबासाहेबांनी चाळीतलं आपलं घर सोडलं ते घर त्यांनी समता सैनिक दलाचे प्रमुख असलेल्या कालीदास सखाराम ताडीलकर यांना दिलं. कालिदास ताडीलकर हे चळवळीतले कार्यकर्ते होते. त्यांची चौथी पिढी आता त्या खोलीत वास्तव्यास आहे.
1934 साली बाबासाहेबांनी दादरच्या हिंदू कॉलनीत राजगृह हा बंगला बांधला. तिथं बाबासाहेबांचं 15 ते 20 वर्ष वास्तव्य होतं. राजगृहमध्ये बाबासाहेबांची खोली आणि त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय करण्यात आलंय. आजही देशाच्या कानाकोप-यातून आंबेडकरी अनुयायी या महापुरुषाच्या वास्तव्यानं पावनव झालेली ही वास्तू पाहण्यासाठी येतात. या वास्तूत आल्यावर जणू बाबासाहेबांचा स्पर्श जाणवत असल्याची भावना प्रत्येक भीमसैनिकात असते.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका समाजाचा उद्धार घडवून आणला… बाबासाहेबांचं मूळ गाव कुठं आहे. त्यांचं मूळचं आडनाव काय आहे हे अनेकांना माहिती नाही… देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या महामानवाचं गाव सामान्यांना माहिती व्हावं यासाठी हा प्रपंच….
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती आहे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्या गावात झाला. त्यांचा जन्म महार जातीत झाल्यामुळे लोक त्यांना अस्पृश्य आणि खालच्या जातीतील मानत होते. यामुळे त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सामाजिक भेदभाव, जातीयवाद आणि अस्पृश्यतेचा सामना करणाऱ्या भीमराव आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. समाजातील अस्पृश्यता, जातिवाद, भेदभाव यांसारख्या दुष्कृत्यांचा अंत करण्यासाठी त्यांनी अनेक चळवळीही केल्या.
आता कोण कोण?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आताची पिढी देखील राजकारणा सक्रीय आहेय प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांच्याशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. एक मुलगी परदेशात शिकते तर एकीचे लग्न झालेले आहे. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत.