Maharashtra CBSE Pattern: राज्यातील सीबीएसईचा पॅटर्न वादात सापडला आहे. नव्या पॅटर्ननुसार राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम 30 टक्के तर सीबीएसईचा अभ्यासक्रम 70 टक्के असणार आहे. दरम्यान यानंतर विरोधकांनी काही सवाल केले आहेत.
तसंच शिक्षक आणि पालकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे.
आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी ही घोषणा केलीय. दरम्यान यासाठी शिक्षकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं देखील दादा भुसे यांनी सांगितलं.. मात्र, सीबीएसईची घोषणा करताना अगोदर सर्व व्यवस्था करणं गरजेचं असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. दादा भूसे यांनी केलेल्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाडांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सीबीएसई पॅटर्नमुळे मराठी मातीचा इतिहास पुसला जात असेल तर या पॅटर्नची गरज काय असा सवाल त्यांनी केला. दरम्यान या सीबीएसई पॅटर्नमुळे मराठी आणि इतिहासासोबत कोणतीही तडजोड केली नसल्याचं आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी म्हटलंय. सीबीएसई पॅटर्नची घोषणा केल्यानंतर शिक्षक आणि पालक देखील संभ्रमात पडले आहेत. अचानक करण्यात आलेला बदल विद्यार्थ्यांना झेपणार का? तसंच शिक्षकांच्या प्रशिक्षणाचं काय? असे अनेक प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येताय.
शालेय शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या सीबीएसई पॅटर्नच्या घोषणेनंतर विरोधकांनी सवाल उपस्थित केले आहेत. एवढंच नव्हे तर शिक्षक आणि पालकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालाय. तसंच 30 टक्के राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात इतिहासाला कितपत न्याय मिळणार? असा देखील प्रश्न उपस्थित होतांना दिसतोय.
दरवर्षी एकेक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाणार
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 70 टक्के – 30% फॉर्म्युला राबवला जाणार आहे. यामध्ये 70 टक्के सीबीएससी तर 30 टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे. भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली.सीबीएससी अभ्याक्रमातील इतिहास विषयात राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील 30% मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावर्षी पहिली इयत्तेला सीबीएससी अभ्यासक्रम असेल त्यानंतर दरवर्षी एकेक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची असणार आहे. 1 जूनला शाळा सुरू झाल्यानंतर लगेच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक यंदा कोलमडण्याची भीती
शाळांचे वर्षभराचे वेळापत्रक यंदा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शिक्षण विभागाकडून अचानक पहिल्या इयत्तेपासून नवव्या इयत्तेपर्यंतची वार्षिक परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याची सूचना जारी केली. मात्र या सुचनेमुळे शैक्षणिक वर्तुळात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच व्हाव्यात, अशी शिक्षकांसह पालकांची मागणी आहे. त्यातच आता मुंबईतील शाळांमधील मुख्याध्यापकांसमोर या निर्णयामुळे नवा प्रश्न निर्माण झाला आहे. आताच्या नव्या सुचनेप्रमाणे परीक्षा संपवून नवीन शैक्षणिक वर्षातील दहावीचा अभ्यासक्रम कधी सुरू करायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडलाय.अनेक शाळांमध्ये इयत्ता दहावीचे वर्ग एप्रिल महिन्यातच घेण्यास सुरु होतात. सामान्यप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी दहावीच्या मुलांचे वर्ग सुरु होतात. याच काळात दहावीच्या मुलांचा बराचसा अभ्यासक्रमही पूर्ण करतात. मात्र आता नव्या सुचनेनुसार वार्षिक परीक्षाच 22 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून त्यामुळे दहावीच्या या वर्गांचे नियोजन आता करता येणार नाही, अशी खंत शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.