Maharashtra Weather Alert: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. कोकणात पाऊस थोडा ओसरला असला तरी घाटमाथ्यावर अद्यापही मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळं कोल्हापूर-सांगली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं शहरात पुराचे पाणी शिरले आहे. राज्यात घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात येत्या 4-5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुण्यासह घाट परिसरात मुसळधार पाऊस बरसू शकतो. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा घाट माथ्यासाठी देण्यात आला आहे. तर, सामान्य स्वरुपाचा पाऊस राज्यातील इतर जिल्ह्यांत होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोल्हापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे तर, साताऱ्याला आजसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबईत काय आहे पावसाचा स्थिती?

मुंबईत कालपासून पावसाने उसंत घेतली आहे. आजही पहाटेपासून पावसाचा जोर ओसरला आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमीपर्यंत राहणार आहे. 

या जिल्ह्यांना अलर्ट

रायगड – ऑरेंज
सिंधुदुर्ग – ऑरेंज 
रत्नागिरी – ऑरेंज 
ठाणे – यलो 
मुंबई – यलो 
पुणे – ऑरेंज 
सातारा – ऑरेंज 
चंद्रपूर – ऑरेंज 
गडचिरोली -ऑरेंज 
गोंदीया – ऑरेंज 
नागपूर – यलो 

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 3 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे.

पंढरपुरात नदीची पाणी पातळी वाढली

नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाने वीर धरणातून सोडलेले पाणी आज मध्यरात्री पंढरपूर मध्ये दाखल झाले आहे. यामुळे चंद्रभागा नदी दुधडी भरून वाहू लागलेली आहे चंद्रभागा त्याच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरांना पाण्याने वेढा टाकलेला आहे नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे नदीच्या पाण्यात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने भाविकांना केलेला आहे.





Source link