Uddhav Thackeray Shivsena ready for alliance with BJP Eknath Shinde: कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर संजय राऊतांनी नाराजी जाहीर केली आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवकच आम्ही भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. जर सन्मानजक प्रस्ताव आला तर आम्ही विचार करुन असं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. मातोश्रीबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.
एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे नगरसेवकांनी पाठिंबा जाहीर केला असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. गटनेते उमेश बोरगावकर यांनी भेटीनंतर सांगितलं की, “आम्ही सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो. निवडणुकीनंतर सर्वांची भेटण्याची इच्छा होती. पुढील वाटचाल कशी असायला पाहिजे या संदर्भात चर्चा केली व साहेबांनी मार्गदर्शन केलं”.
“जर पाठिंब्याबाबत कोणत्याही पक्षाने प्रस्ताव दिला आणि तो सन्मानपूर्वक तर त्याबाबत विचार कसा करावा याबाबत चर्चा झाली,” अशी माहिती त्यांनी दिली. इतर पक्षांनी आमच्याशी संपर्क साधल्याची कबुली यावेळी त्यांनी दिली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवकांचे आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव… pic.twitter.com/Ge3Zvf3W0E
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 21, 2026
‘भाजपा आणि शिंदेसेनेने संपर्क साधला’
ते म्हणाले की, “पाठिंबा मागण्यासाठी आमच्याशी भाजपा आणि शिंदेसेनेने संपर्क साधला आहे. जर सन्मान होत असेल तर त्या प्रस्तावाचा विचार करु”. शिदेंना पाठिंबा देणार का? असं विचारलं असता त्यांनी तसा प्रस्ताव येऊ द्या असं म्हटलं. प्रस्ताव आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पातळीवर निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘भाजपाकडून प्रस्ताव आला आहे’
आमची यासंदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. अन्यथा सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावू शकतो असं ते म्हणाले आहेत. “आम्हाला शिंदेंसोबत जाण्याचं काही वावडं नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. आमची दीपेश म्हात्रेंसोबत चर्चा झाली असून, त्यांनी प्रस्ताव दिला आहे. भाजपाकडून प्रस्ताव आला आहे. त्याबाबत चर्चा सुरु असून, वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊ,” असं त्यांनी सांगितलं.
“जे नॉट रिचेबल आहेत त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार आहे. गटनेता म्हणून मी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यांचं सदस्यत्व पद धोक्यात आलं आहे. आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, पण काही झालेला नाही. आता ते लपलेत, किडनॅप केलंय की अन्य काही हे येत्या काही दिवसांत उघड होईल,” असं त्यांनी सांगितलं आहे.
चार नगरसेवक ‘नॉट रीचेबल’
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मधुर म्हात्रे ,कीर्ती ढोणे ,राहुल कोट, स्वप्नाली केणे हे नवनिर्वाचिक नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने कल्याण डोंबिवलीतील सस्पेन्स वाढला आहे.
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यासंदर्भात महायुतीचा महापौर, भाजपाचा दावा
या सर्व घडामोडींदरम्यान भाजपाने मात्र कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात भाजप शिवसेना महायुतीचाच महापौर होणार असा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत दौऱ्यावरून परतल्यावर भाजप नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिका मध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच सविस्तर चर्चा झाली होती.