Maharashtra Assembly Election Bitcoin Scam: महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. मतदानाच्या एक दिवस आधीच मंगळवारी पुण्यातील एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. माजी आयपीएस अधिकाऱ्याने या दोन्ही नेत्यांनी 2018 साली बिटकॉइनच्या माध्यमातून व्यवहार केलेले आणि त्याच पैशांचा आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. माजी आयपीएस अधिकाऱ्याने सुप्रिया सुळेंवर आरोप केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने यावरुन गंभीर आरोप सुप्रिया सुळेंवर केलेले असतानाच सुप्रिया सुळेंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

नेमकं काय म्हटलं आहे भाजपाने

भाजपाचे नेते सुधांशु त्रिवेदी यांनी या प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मतदानाच्या काही तास आधीच महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले. त्यांनी काँग्रेसला तुम्ही कोणत्या बिटकॉइन व्यवहारांमध्ये सहभागी आहात का? असा सवाल विचारला. सुधांशु यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवरही गंभीर आरोप केले. सुधांशु त्रिवेदींनी, “फारच गंभीर आणि चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. या मधून महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार हळूहळू समोर येत आहे. हे प्रकरण म्हणजे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकींवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार आहे,” असं म्हटलं आहे. भाजपाने केलेल्या दाव्यानुसार नाना पटोले, सुप्रिया सुळे, पोलीस कमिश्नर अमिताभ गुप्ता आणि डीलर अमिताभ यांनी एकमेकांना व्हॉइस नोट्स पाठवल्या होत्या. 

व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट दाखवत गंभीर आरोप अन् पाच प्रश्न

सुधांशु त्रिवेदी यांनी व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट दाखवत, “या चॅट आणि नोट्समधून हे दिसत आहे की सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी बिटकॉइनमधून व्यवहार केले जात आहेत,” असा दावा केला आहे. सुधांशु त्रिवेदी यांनी पाच प्रश्न उपस्थित करत सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. “पाच बोटं असणारा पंजा या पाच प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नसेल तर देशातील जनतेला समजेल की पंजा कोणासाठी काम करत आहे,” असं सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे. “आता असं वाटत आहे की ते योग्य मार्गाने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असते तर अशाप्रकारे बेकायदेशीर माध्यमातून पैसा कमवण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नसता,” असा टोला सुधांशु त्रिवेदी यांनी लगावला आहे. सुधांशु त्रिवेदी यांनी विचारलेले पाच प्रश्न खालीलप्रमाणे: 

1) तुम्ही बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का?

2) तुम्ही कधी डीलर गौरव मेहता आणि अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क केला आहे का?

3) हे व्हॉट्सअप चॅट तुमचं आहे का?

4) हा तुमचा आवाज आहे की नाही हे तुम्हाला सांगावं लागेल.

5) या नोट्समध्ये कोणत्या मोठ्या व्यक्तीसंदर्भात चर्चा होत आहे.

हे लोक असले धंदे करतात

सुधांशु त्रिवेदी यांनी पुढे बोलताना, “हा केवळ आरोप नाही. महाराष्ट्रातील जनतेने हे ओळखावं की हे लोक कसले कसले धंदे करतात. हा तोच पक्ष आहे ज्यांची सत्ता होती तेव्हा गृहमंत्र्यांवर कोट्यवधी रुपयांची वसुली करण्याचा आरोप करण्यात आलेला,” असंही म्हटलं. 

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या आरोपांनंतर सुप्रिया सुळेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “भाजपा घाणेरडं राजकारण करत आहे. सुधांशु त्रिवेदींविरोधात मी मानहानीचा खटला दाखल करणार आहे. मी अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही. यामध्ये माझा आवाज तयार करुन वापरण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडे मी याबाबत तक्रार केली आहे,” असं सुप्रिया यांनी सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या आरोपांवर बोलताना म्हटलं आहे.

थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या आरोपांसंदर्भात सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगाकडे एक तक्रार करणारं पत्रही लिहिलेलं आहे. सुप्रिया सुळेंच्यावतीने त्यांच्या वकिलांनी लिहिलेल्या पत्रामध्ये, “पुण्याचे माजी आयपीअस अधिकारी रविंद्रनाथ पाटील आणि गौरव मेहतांविरोधात तात्काळ सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली जावे. हे सुप्रिया सुळेंबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत,” असं म्हटलं आहे.

तसेच, “त्यांचा आरोप आहे की नाना पटोले आणि सुप्रिया सुळेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये पैसा वाटण्याच्या उद्देशाने बिटकॉइनचा गैरवापर केला. त्यांनी आरोप करताना सुप्रिया सुळेंचा नकली आवाजही वापरला आहे. डिजीटल माध्यमांचा वापर करुन फसवणूक आणि बदनामीच्या उद्देशाने आरोप करणं हा गंभीर गुन्हा आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे असून सुप्रिया सुळेंची प्रतिमा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक रात्र आधीच हे आरोप करण्यात आले आहेत ही आश्चर्याची बाब आहे. यामधूनच या खोट्या आरोपांमागील हेतू स्पष्ट होत आहे. या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्याची आणि अशा व्यक्तींची सखोल चौकशी करण्याची आमची मागणी आहे,” असं म्हटलं आहे.





Source link