Congress Oppose Raj Thackeray Stand On North Indian: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही बंधू एकत्र आले तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
काँग्रेसची बैठक अन् गोंधळाची स्थिती…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. पूर्वनियोजित बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा सरचिटणीस वेणुगोपाल यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. पक्ष संघटना, आगामी निवडणुकांसाठी आणि त्यासाठी संभाव्य आघाडी यासारख्या स्थानिक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि नंतर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची औपचारिक भेट घेतली. काँग्रेसचे जुने मुख्यालय 24 अकबर मार्ग येथे बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिल्लीतील नेते मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे सोमवारची ही दिल्लीत झालेली बैठक पूर्वनियोजित होती आणि राहुल गांधींनी बोलावली असल्याचा निरोप नेत्यांना देण्यात आला होता. मात्र श्रेष्ठींच्या अनुपस्थितीत प्रभारी रमेश चेत्रिथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच चर्चा केली. पक्षश्रेष्ठींनीच बैठकीकडे पाठ फिरवल्याबद्दल प्रदेश पातळीवरील नेते नाराज झाल्याचे कळते. प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षच बैठक घेणार असतील तर ती मुंबईतही होऊ शकली असती. दिल्लीत घेण्याची गरज काय होती, असा सवाल एका नेत्याने उपस्थित केला. अन्य एका नेत्याने बैठक कशासाठी बोलावली होती हे कळलेच नाही, अशी टिप्पणी केली.
काँग्रेसचा राज ठाकरेंना विरोध
याच बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चेत्रिथला यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नसल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे, “राज ठाकरे यांची उत्तर भारत आणि दक्षिण भारत ही भूमिका मान्य नाही. भारत एक आहे,” अशी बोलकी प्रतिक्रिया चेन्नीथला यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळाची भूमिका घेणार का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रात आणि कर्नाटकात वेगळी भूमिका कशी? असा थेट सवाल
यावर मनसेकडून पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. “रमेश चेन्निथला यांना आणि काँग्रेसला आमची भूमिका समजली नाही. आज कर्नाटकमध्ये एक भूमिका महाराष्ट्रात एक भूमिका असं यांचं आहे. 2009 ला काय भूमिका होती आमची? आजही आमची भूमिका कायम आहे. आमची भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे,” अशी अपेक्षा देशपांडेंनी व्यक्त केली आहे. “कर्नाटकात कन्नड तर आपल्या राज्यात मराठीच आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षाचा अशा भूमिकेला पाठिंबा नव्हता आता काँग्रेसमध्ये थोडा बदल झाला आहे. दोन बंधू एकत्र येण्याचा मुद्दा नाही. हा मराठी माणसाचा विषय आहे,” असंही देशपांडे आवर्जून म्हणाले.
5 जुलैच्या मेळाव्याची जबाबदारी या व्यक्तीवर…
आमच्या पक्षाचे नेते बाळा नांदगावकर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासोबत बोलतील. मेळाव्याचं सविस्तर नियोजन करतील. राजकीय पक्षाचा हा मेळावा नाही मराठी माणसाचा आहे याची काळजी आम्ही घेऊ, असं 5 जुलैच्या मेळाव्याबद्दल बोलताना देशपांडेंनी स्पष्ट केलं.