Amravati: अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत प्रशासनाची शिस्तच धाब्यावर बसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. येथे महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यात कार्यालयातच उघडपणे फ्री स्टाईल हाणामारी झाली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे. (Amravati Crime)
अमरावती जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीत थेट ग्रामपंचायत कार्यालयातच फ्रीस्टाईल हाणामारीचा थरार पाहायला मिळाला. महिला सरपंच पद्मा मेसकर आणि ग्रामपंचायत सदस्य राजू उल्ले यांच्यात जागेच्या वादावरून जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता वातावरण तापलं. वाद एवढा पेटला की महिला सरपंचाने थेट सदस्याच्या कानशिलात लगावली. यानंतर सदस्यानेही प्रतिउत्तर दिलं आणि दोघांमध्ये अक्षरशः धक्काबुक्की सुरू झाली. या संपूर्ण घटनेचं थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे.
नेमकं घडलं काय?
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पद्मा मेसकर आणि विरोधी गटाचे सदस्य राजू उल्ले यांच्यामध्ये तीव्र वाद निर्माण झाला. वाद इतका विकोपाला गेला की, दोघांनी एकमेकांवर थेट हात उचलला. कार्यालयातील कामकाज सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली. या हाणामारीचे दृश्य कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येते.
प्राथमिक माहितीनुसार, ग्रामपंचायत हद्दीतील एका जागेच्या “नमुना आठ अ फेरफार” संदर्भात हा वाद निर्माण झाला होता. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि काही क्षणांतच तो मारहाणीत बदलला. या हाणामारीत दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून, उपस्थित ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलं. या संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, ग्रामपंचायत कार्यालयातच असे प्रकार घडणे ही लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, स्थानिक पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकाराचा तपास सुरू केला असून, संबंधित सीसीटीव्ही फुटेजही तपासात घेतले आहे.गाव पातळीवरील लोकप्रतिनिधीच जर अशा प्रकारे वागू लागले, तर सामान्य नागरिकांचे प्रश्न कसे मार्गी लागणार? असा प्रश्न सध्या गावकऱ्यांमधून विचारला जात आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीची प्रतिमा मलीन झाली असून, या संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे…
आणखी वाचा