Raj Thackeray Reaction: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे बंधू उद्धव ठाकरे यांना मातोश्री या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. राज-उद्धव या ठाकरे बंधुंच्या अचानक भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अनेकांनी या भेटीचे स्वागत केलंय तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळाला. दरम्यान उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज यांनी सोशल मीडियावरुन फोटो पोस्ट करत एक कॅप्शन लिहिलीय. यामुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आलंय. 

काय म्हणाले राज ठाकरे? 

मातोश्रीवर उद्धव यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे शिवतीर्थवर परतले. यानंतर त्यांनी सोशल मीडियात बंधू भेटीचा फोटो शेयर केला. ज्यावर ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या  बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या…’ असे कॅप्शन दिले. यातून राज ठाकरेंना काय सुचवायचे आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागलाय. 

याआधी कशामुळे आले ठाकरे बंधू एकत्र?

केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात हिंदी सक्तीचा प्रस्ताव आल्यानंतर महाराष्ट्रात मोठा विरोध उभा राहिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे आवाज उठवला. या मुद्द्यावर त्यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याची योजना आखली होती, परंतु सरकारने हा निर्णय मागे घेतल्यानंतर 5 जुलै 2025 रोजी वरळी येथील NSCI डोम येथे विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात दोघेही एकाच व्यासपीठावर आले, ज्याने त्यांच्या जवळीकीला नवे वळण मिळाले.दोघांनीही मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात, “आमच्यातील आंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,” असे विधान केले, तर राज ठाकरे यांनी, “कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे सांगितले.

पालिका निवडणुकीसाठी येणार एकत्र?

आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मराठी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि सत्ताधारी महायुतीला (BJP-शिंदे गट) आव्हान देण्यासाठी ही जवळीक महत्त्वाची मानली जाते. असे असले तरी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. शिवसेनेत असताना राज ठाकरेंना पक्षात दुय्यम स्थान दिले गेले आणि उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपदी नियुक्त केले गेले. यामुळे दोघांमधील राजकीय आणि वैयक्तिक तणाव वाढला. राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून मनसे स्थापन केली. 2006 नंतर अनेकदा राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या, परंतु राजकीय मतभेद आणि कार्यकर्त्यांमधील स्थानिक पातळीवरील संघर्षांमुळे युती शक्य झाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनीही दोघांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली होती, पण ती प्रत्यक्षात आली नव्हती.

राजकीय अस्तित्वाचे आव्हान आणि मराठी मतदारांचा पाठींबा

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मोठाधक्का बसला, तर मनसेला निवडणुकांमध्ये सातत्याने अपयश आले आहे. दोन्ही पक्षांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी मतदारांमध्ये इतर भाषिकांच्या वाढत्या प्रभावामुळे नाराजी आहे. राज ठाकरे यांचे वक्तृत्व आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा पारंपरिक जनाधार यांचा एकत्रित परिणाम सत्ताधारी महायुतीला आव्हान देऊ शकतो. तसेच मराठी मतदारांचा मोठा पाठींबा ठाकरे बंधुंना पाहायला मिळतोय.





Source link