Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरासमवेत अरबी समुद्रामध्येसुद्धा निर्माण होणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि एकंदर कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांना 13 ते 19 ऑगस्टदरम्यान मान्सून झोडपणार असल्याचं म्हटलं गेलं. मात्र काही भाग वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण वगळता पावसानं फारशी समाधानकारक हजेरी लावली नाही.
पुढील 24 तासांमध्ये कसं असेल राज्यातील पर्जन्यमान?
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यात प्रामुख्यानं कोकण विभाग, घाटमाथ्यावरील क्षेत्र, विदर्भ आणि संलग्न मराठवाडा या भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. जिथं काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊसधारा बरसतील तर, काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असेल.
१५ ऑगस्ट,२०२५, स्वातंत्र्य दिवसाच्या आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा#कोकणात, #घाटभागात, #विदर्भ व संलग्न #मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. अन्य काही ठिकाणी #मेघगर्जनेसह तर इतर ठिकाणी #हलका_मध्यम पावसाची शक्यता आहे.
: IMD@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/b06ZWqMBjP— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 14, 2025
दरम्यान, मुंबईसह ठाणे पालघर भागात शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्यानंतर रविवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. राज्यात प्रामुख्यानं धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, यवतमाळमध्ये मेघगर्जनेसह आणि मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग इथं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
FAQ
कोकणात कसं असेल हवामान?
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मुसळधार पाऊस. मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह (30-40 किमी/तास) जोरदार पावसाची शक्यता.
घाटमाथ्यासाठीचा अंदाज…
पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूरच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. भूस्खलनाचा धोका असू शकतो.
विदर्भात कोणत्या भागांना पाऊस झोडपणार?
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ येथे मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी वारे.