Melghat Bus Accident : अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ एका खाजगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात (Accident) झालाय. यात सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटमधील खटकालीजवळील हाय पॉइंट जवळ बस दरीत कोसळली आहे. या बसमधील 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर बस मधील सर्व लहान मुलं सुरक्षित असल्याचेही सांगण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच अकोटवरून एकलव्य बचावपथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाले असून प्रवाश्यांना दारितून काढण्याचे काम करण्यात येत आहे. तर त्यातील जखमी लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं, अन् बस थेट दरीत कोसळली
मेळघाटमधील सातपुडा पर्वतरांगातील हाय पॉइंट जवळ आज सकाळच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही बस अकोटवरून धारणी येथे येत असताना ट्रॅव्हल आकोट धारणी घाटात आली असता बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ही बस थेट दरीत जाऊन कोसळलीय. या बसमध्ये 25-30 प्रवासी असून त्यातील 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच एकलव्य बचाव पथकासह वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी जखमी लोकांना सुखरूप दरीतुन काढण्यात पोलीस आणि स्थानिकांना यश आले असून जखमींना टेम्ब्रूसोडा आणि अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले आहे. तर या घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.
रस्त्यावर पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं
अशीच एक अपघाताची (Accident) खळबळजनक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. यात एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका व्यक्तीला चिरडलं आहे. संशयास्पद रित्या हा अपघात घडला असून नेमका हा अपघात आहे की घातपात? असा संशय आता घेण्यात येत आहे. तर घटणेनंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. मात्र, या संपूर्ण अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून भारतीय न्याय संहितेनुसार जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..