Akola Lok Sabha Election 2024 अकोला : अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावलीये. त्यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून ही नोटीस बजावण्यात आलीये. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्या लोकसभेवरील निवडीला आव्हान दिलंय. या नोटिसीला 2 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने धोत्रे यांना दिलेयेत. धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केला, असा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्याची मागणी चव्हाण यांनी याचिकेत केलीये.
लोकसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा 95 लाख इतकी होती. मात्र धोत्रे यांनी निवडणुकीत 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी केलाय. धोत्रेंनी हा खर्च दडवून ठेवण्याचा आरोपही त्यांनी केलाय. खासदार अनुप धोत्रे आता न्यायालयाला काय उत्तर देणार?, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणारेय.
याचिकाकर्त्याचे नेमकं म्हणणं काय?
खासदार अनुप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीमध्ये स्वत: 81 लाख 17 हजार 102 रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे. यासोबतच भाजपने त्यांच्यासाठी 6 लाख 55 हजार 830 रुपये खर्च केल्याची माहिती त्यांनी सादर केली आहे. हा एकूण खर्च त्यांनी 87 ला 72 हजार 932 एवढा दाखवला आहे. मात्र भाजपने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. धोत्रे यांनी ही माहिती निवडणूक विभागाला खर्चाच्या हिशोबात देणे आवश्यक होती. परंतु त्यांनी तसे न करता ही माहिती लपवून निवडणुक आयोगाची दिशाभूल केली असून त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांचे याचिकेमधून म्हणणे आहे.
पहिल्याच निवडणुकीत अनुप धोत्रे ठरलेत जायंट किलर
अकोल्यातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केलाय. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले आहेत. चाळीशीतील अनुप धोत्रे ठरलेत जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे याआधी सलग चार वेळेस खासदार झाले होते. संजय धोत्रे आजारी असल्याने अनुप धोत्रेंना भाजपनं मैदानात उतरवलं होतं. त्यात त्यांनी एकहाती यश खेचून आणले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..