Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीच्या गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) अनुषंगाने 10 मुस्लिम उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत आम्ही नांदेड दक्षिणमधून मुस्लिम उमेदवार दिला आहे. आज परत दुसऱ्या यादीत आम्ही 10 मुस्लिम उमेदवारांची यादी जाहीर करतोय. सोबतच राज्याच्या राजकारणात आम्हाला मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायचे असल्याची माहिती रेखा ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची आगामी विधानसभेसाठी नेमकी रणनीती काय? असा प्रश्न आता साऱ्यांना पडू लागला आहे. 

काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांचा वंचितमध्ये प्रवेश

दरम्यान,अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. खतीब हे प्रदेश काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार आणि पक्षाचे माजी उपाध्यक्ष राहिले आहे. गेल्या साठ वर्षांपासून बाळापुर नगरपालिकेवर खतीब घराण्याची सत्ता राहिली आहे. तर 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे खतीब आणि त्यांच्या पत्नीचा अतिशय अत्यल्प मतांनी पराभव झाला होता. बाळापुर मतदारसंघ हा महाविकास आघाडीत नितीन देशमुख यांच्या वाट्याला जाणार असल्याची शक्यता आहे. अशातच त्या अनुषंगाने खतिबांनी वंचित बहुजन आघाडीची वाट धरली असल्याचेही बोलले जात आहे. खतीब यांच्या वंचित मधील प्रवेशाने बाळापुर मधील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. तर खतीब यांच्या काँग्रेस सोडण्याने अकोल्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. 

वंचितच्या 10 मुस्लिम उमेदवारांची यादी 

मलकापूर – शहजाद खान सलीम खान 
बाळापूर – खतीब सैयद नतीकुद्दीन 
परभणी – सैयद साहेबजान 
औरंगाबाद सेंन्ट्रल – जावेद कुरेशी 
गंगापूर – सैय्यद गुलाम नबी सय्यद 
कल्याण पश्चिम – अयाज मौलवी 
हडपसर – अॅड. मोहम्मद मुल्ला 
माण – इम्तियाज नदाफ 
शिरोळ – आरीफ पटेल 
सांगली  – अल्लोद्दीन काझी

काँग्रेससह परभणीत महाविकास आघाडीला हादरा?

दरम्यान, काँग्रेसचे माजी उप महापौर आणि विद्यमान महापालिकेचे सभागृह नेते सय्यद समी सय्यद साहेबजान (माजु लाला) यांची वंचित कडून परभणी विधनसाबेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दहा मुस्लिम उमेदवारांच्या यादीत सय्यद समी यांच्या नावाचा समावेश आहे. सय्यद समी परभणी काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जातात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सय्यद सामी यांचे भाऊ सय्यद खालेद यांनी विधानसभा निवडणूक लढवत 45 हजार मतदान घेत दुसरा क्रमांक गाठला होता. त्यामुळे काँग्रेससह परभणीत महाविकास आघाडीला मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link