Aurangzeb Tomb Issue Sanjay Raut Reacts: औरंगजेबची कबर हटवली जावी या मागणीसाठी राज्यभरातील अनेक ठिकाणी बजरंग दलाकडून आंदोलन केलं जात आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज तिथीनुसार असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘औरंगजेबची कबर हटाव’ असे बॅनर्स हातात धरुन आंदोलनं केल्याचं पाहयला मिळालं. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आपलं परखड मत नोंदवताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
हिंमत आहे का असा आदेश काढण्याची?
बजरंग दलाच्या आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी, “महाराष्ट्रात, देशात, राज्य कोणाचे आहे? त्यांचेच आहे. त्यांच्याच पक्षाचे राज्य आहे. मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत? या विचारांच्या लोकांचे आहेत. हिंसक हिंदुत्ववाचे आहेत. मग त्यांना अडवलं कोणी कबर हटवायला? शासनाने हटवावी ना कबर! मारामाऱ्या कशाला करता? नाटकं कशाला करता? लोकांना त्रास का देता? सांगा आरएसएसला फर्मान काढा म्हणून, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ही भाजपची पिल्लं आहेत. मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा, हिंमत आहे का असा आदेश काढण्याची?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> ‘6 महिन्यात आणखी एक विकेट जाणार,’ सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, ‘जो बायकोच्या आड…’
…मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं
“या क्षणी औरंगजेब कबरीच्या भोवती केंद्र सरकारचा पोलीस दल आहे. मग ते का ठेवलं संरक्षणासाठी? केंद्र सरकारचं पोलीस दल आणि जागा सरकारच्या आख्याधारित आहे,” असंही राऊत म्हणाले.
#WATCH | Nagpur, Maharashtra: Bajrang Dal stages a protest in front of Chhatrapati Shivaji Maharaj’s statue over their demand to remove Aurangzeb’s tomb pic.twitter.com/s5Z2tpIc7r
— ANI (@ANI) March 17, 2025
“छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य काय असतं हे या महाराष्ट्राला, देशाला दाखवलं. त्याचे स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर! महाराष्ट्रावरती हल्ला करणारे किंवा हल्ला करायला येणारी व महाराष्ट्राचे पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीने छत्रपती संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पहावी मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं असं आम्ही सांगतो,” अशी भूमिका राऊतांनी मांडली.
नक्की वाचा >> …म्हणून सरकारला औरंगजेबच्या कबरीला द्यावं लागतं संरक्षण; फडणवीसांनी जाहीर भाषणात सांगितलं कारण
…म्हणून ही थडगी असायला पाहिजेत
“छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कबर खणलेली आहे. ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा हा इतिहास आहे. ज्याला इतिहासाचे भान नाही असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रडत असलेली लोक आहेत. तेच हे करत आहेत. अफजलखानाचा कोथळा महाराजांनी काढला इतिहासाला ते पिढीला माहिती पाहिजे. ही सगळी काही लोक आणि उद्योग करतात इतिहास नष्ट करण्याचे काम सुरू आहे. ही थडगी असायला हवीत. हा आमचा इतिहास आहे. हा आमच्या शौर्याचा इतिहास आहे,” असं राऊत म्हणाले.