Uddhav Thackeray Shivsena On Why Eknath Shinde Visits Delhi: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षांवर निशाणा साधला आहे. राज्यातील सरकारमधल्या घटक पक्षांमध्ये अनेकदा नाराजीनाट्यच सुरु असते असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखामधून केलेल्या या टीकेत मुख्यपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदेंचा उल्लेख ‘सरकारमधील अंतर्गत नाराजीचे स्वयंघोषित ‘ब्रँड अम्बेसेडर’ असा करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता सतत एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी का जातात याबद्दलही या लेखातून भाष्य करण्यात आलं आहे.

बेबनाव पुन्हा चव्हाट्यावर

“गेल्या आठवड्यात ‘बेस्ट’ उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यावरूनही सामान्य प्रशासन विभाग आणि नगरविकास विभाग यांनी एकाच दिवशी स्वतंत्र आदेश काढले होते. त्यावरूनही फडणवीस-मिंधे यांच्यातील बेबनाव पुन्हा चव्हाट्यावर आलाच होता,” असा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये निर्णयांवरुन समन्वय नसल्याकडे लक्ष वेधलं आहे. “सरकारमधील अंतर्गत नाराजीचे ते (एकनाथ शिंदे) स्वयंघोषित ‘ब्रँड अम्बेसेडर’च आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा नाराजीची उचकी लागत असते आणि ती दाखवून देण्याचा त्यांचा उद्योग सुरू असतो,” असा खोचक टोला लेखातून लगावण्यात आला आहे.

नाराजीनंतरचे दुसरे यशस्वी ठिकाण साताऱ्यातील ‘दरे’ गाव

एकनाथ शिंदेंवर टीका करताना, “आताही त्यांना अशीच उचकी लागली आणि मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते गैरहजर राहिले. ते म्हणे थेट श्रीनगरला जाऊन बसले आहेत. श्रीनगरात ते कशासाठी गेले? एकतर त्यांनी कामाख्या मंदिरात अघोरी पूजेसाठी आसाम-गुवाहाटीला जायला हवे होते. नाहीतर त्यांचे नाराजीनंतरचे दुसरे यशस्वी ठिकाण साताऱ्यातील ‘दरे’ गावी जायला हवे होते, पण नाराज मिंधे गेले थेट श्रीनगरात. तेथे त्यांनी एका पडेल पहेलवानासोबत रक्तदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रसिद्धीसह पार पाडला. उपमुख्यमंत्री असलेल्या मिध्यांकडे महाराष्ट्र मंत्रिमंडळातली मलईदार खाती आहेत. नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते उपक्रम. त्यात हे महाशय कधी लक्ष घालतात?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे. 

…म्हणून शिंदे सतत दिल्लीला मोदी-शाहांना भेटायला जातात

एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत, “इथे मलिदा-मलई गोळा करायची व दिल्ली, श्रीनगर, दरे गाठायचे हाच यांचा सार्वजनिक उपक्रम सध्या आहे. म्हणजे एकंदरीत असे की, मुख्यमंत्री फडणवीस हे मिंध्यांना असे धक्के देत असतात की मिंध्यांचे मन मंत्रालयात रमत नाही. त्यामुळे मिंधे दिल्लीत जातात ते फडणवीसांवर कारवाईची मागणी करण्यासाठीच. गेल्या आठवड्यातही मिंधे यांनी याचसाठी दिल्लीवारी केली होती. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांची भेट घेऊन नाराजीचा पाढा वगैरे वाचला होता. त्यांनी म्हणे पंतप्रधानांना ‘महादेवा’ची मूर्तीही एक प्रतीक म्हणून भेट दिली. मिंधे यांचे हे असे अधूनमधून ‘कैलास पर्वता’वर जाणे आणि तेथे आपल्या ‘नाराजीच्या जटा’ आपटणे हे काही जनतेला नवीन राहिलेले नाही,” असं लेख म्हटलं आहे.

कुरघोड्या-कुरबुरी अशी ‘कु’ची बाराखडी

“महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामे होताना दिसत नाहीत. कारण सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे. त्यातून रोजच एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. कुणी श्रीनगरला जाऊन बसत आहे तर कुणी कोणाची ‘जनाची-मनाची’ काढत आहे. सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या-कुरबुरी अशी ‘कु’ची बाराखडी सुरू आहे. हे सरकार जनतेचे आहे, असे सत्ताधारी म्हणत असले तरी हे नाराजांचे सरकार आहे. सत्ताधारीही नाराज आणि जनतादेखील. सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी नाराजीच्या ‘छटा’ दाखवीत आहेत, तर कुणी नाराजीच्या ‘जटा’ आपटत आहेत,” असं म्हणत लेख संपवला आहे.

FAQ

1. ‘सामना’च्या अग्रलेखात शिंदे-फडणवीस सरकारवर कोणता प्रमुख आरोप आहे?
उत्तर: सत्ताधारी पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी आणि कुरघोड्यांचे नाट्य सुरू आहे. सरकार जनहिताची कामे करत नसून, सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे. यामुळे एकमेकांची उणीदुणी काढण्यात आणि कुरबुरींमध्ये त्यांचा वेळ खर्च होतो, असा आरोप आहे.

2. एकनाथ शिंदे यांच्याबाबत अग्रलेखात काय म्हटले आहे?
उत्तर: एकनाथ शिंदे यांना सरकारमधील अंतर्गत नाराजीचे ‘स्वयंघोषित ब्रँड अम्बेसेडर’ संबोधले आहे. त्यांना वारंवार नाराजीची ‘उचकी’ लागते आणि ते मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून श्रीनगरला रक्तदानाच्या कार्यक्रमासाठी गेले. त्यांच्याकडे मलईदार खाती (नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते) असूनही त्यात लक्ष नसल्याचा आरोप आहे.

3. एकनाथ शिंदे यांच्या श्रीनगर दौऱ्यावर अग्रलेखात काय टिप्पणी आहे?
उत्तर: शिंदे यांनी नाराजीमुळे मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारून श्रीनगरला रक्तदानाचा कार्यक्रम केला. त्यांनी कामाख्या मंदिर (आसाम) किंवा साताऱ्यातील ‘दरे’ गावी जाणे अपेक्षित होते, पण श्रीनगर निवडल्याबद्दल खोचक टिप्पणी आहे.

4. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत काय उल्लेख आहे?
उत्तर: शिंदे सतत दिल्लीला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना भेटून फडणवीसांविरोधात नाराजीचा पाढा वाचतात. गेल्या आठवड्यात त्यांनी पंतप्रधानांना ‘महादेवा’ची मूर्ती भेट दिली आणि ‘नाराजीच्या जटा’ आपटल्याचे लेखात म्हटले आहे.

 





Source link