Samana On Eknath Shinde: राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सारेकाही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. भाजप-शिवसेनेत एकमेकांचे नेते,कार्यकर्ते घेण्याची रस्सीखेच सुरु आहे. रविंद्र चव्हाण आक्रमक भूमिकेत दिसतायत. या पार्श्वभूमी शिवसेना यूबीटी पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आलीय.
शिंदे गटाचा मोदी-शाहांवरचा भ्रम
शिंदे गटाला वाटतं की मोदी-शाह सत्तेत असल्यामुळे त्यांचा कोणी केसही वाकडा करणार नाही. पण भाजप आणि मोदी-शाह कोणाचेच नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी मोदी-शाहांना प्रचंड मदत केली, तरी भाजप त्यांचे झाले नाही. मग शिंदे कोण लागले? कोकणात शिंदेंचे आमदार नीलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. भाजपचे लोक शिंदेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. शिंदे फक्त “युतीचा धर्म पाळा” म्हणून हतबलपणे बोलत आहेत. दोन नंबरच्या लोकांची बडबड कुणी गांभीर्याने घेत नाही, असे अग्रलेखात म्हटलंय.
महायुतीची अस्थिर तीन चाकी रिक्षा
महाराष्ट्रात महायुती ही तीन पायांची राजकीय व्यवस्था आहे. आधी महाविकास आघाडी सरकारला ‘तीन चाकी रिक्षा’ म्हणून टीका करणाऱ्यांच्या नशिबी असंच सरकार आलंय. ही रिक्षा भरकटली आहे आणि कधीही खड्ड्यात पडू शकते. नगरपालिका निवडणुकांमुळे युतीतच हाणामाऱ्या आणि कुरघोड्या सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रोज शिंदेंना टोमणे मारतात. शिंदे सत्ता आणि ED सारख्या भीतीमुळे चुप बसले आहेत, असेही सामनातून म्हटलंय.
दोन नंबरची किंमत
चव्हाण म्हणतात, “दोन नंबर असं काही नसतं, त्याला किंमत नाही. देवाभाऊ (फडणवीस) सबकुछ!” 2 डिसेंबरनंतर युतीचा निकाल लागेल. शिंदे आणि फडणवीस गप्प आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटातच स्पर्धा आहे. राज्यात अनेक समस्या असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त या निवडणुकांसाठी रान उठवत आहेत. 5-6 हेलिकॉप्टर आणि खासगी विमानांचा प्रचारासाठी वापर होतोय – हे पहिल्यांदाच, अशी टीका करण्यात आलीय.
निवडणुकांत पैशाचा खेळ आणि भ्रष्टाचार
निवडणुकांत सत्ता आणि पैशाचा खेळ सुरू आहे. मतदारांना १०-१५ हजार रुपये देऊन खरेदी केली जातेय. जो जास्त पैसा देईल, त्याच्या पक्षाचा दुपट्टा गळ्यात अडकवून ‘झिंदाबाद’ म्हणतात. शिंदे गटाच्या ‘गुलाबो गँग’चा नेता म्हणतो, “आमच्याकडे नगरविकास खाते आहे, पैसाच पैसा आहे. १ तारखेला मतदारांना लक्ष्मीदर्शन होईल.” पण या पैशांमुळे जनतेचं भविष्य आणि महाराष्ट्राची इभ्रत विकली जातेय. फडणवीस म्हणतात, “आमच्याकडे नीती, नियती आणि निधी भरपूर आहे.” सत्तेचे विकेंद्रीकरण संपतंय, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आलीय.
भविष्यात शिंदे गटाची अवस्था
नगरपालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्रात बरेच काही घडेल. चव्हाणांनी शिंदेंवर ‘सुपारी’ कातरायला घेतली आहे. शिंदे गटाची फडणवीस-चव्हाणांनी कोंडी केल्याचे आरोप सामनातून करण्यता आलीय. शिंदे अमित शहांचे राजकीय आश्रित आहेत, त्यांच्याकडे स्वाभिमान किंवा संघर्ष करण्याचं बळ नाही. ते फेकलेल्या तुकड्यांवर जगतात, अशा भाषेतही टीका करण्यात आलीय. शिंदे गटाचे शहाजी पाटील म्हणतात, “आमच्या नशिबी भाजपची गुलामीच आहे.” पुढे भाजप शिंदे गटाचे किमान 35 आमदार गिळून ढेकर देईल. शिंदे गटाचा निर्माता भाजपच आहे, आणि आता ते त्यांचेच शत्रू असल्याचे सामनातून म्हटलंय.
FAQ
१. प्रश्न: सामना अग्रलेखात शिंदे गटाला “दोन नंबर” का म्हणतात आणि त्याची किंमत काय आहे?
उत्तर: कारण २०२२ मध्ये शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेला (एक नंबर) पाठीत खंजीर खुपसून भाजपबरोबर सत्ता घेतली, म्हणून त्यांना “दोन नंबर” म्हणतात. अग्रलेख म्हणतो, “दोन नंबरला खरेच काहीच किंमत नसते.” भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तर जाहीर म्हणतात, “दोन नंबर असं काही नसतं, देवाभाऊ (फडणवीस) सबकुछ!” म्हणजे शिंदे गटाची भाजपला गरज संपली की त्यांना बाजूला केलं जाईल.
२. प्रश्न: सध्या महायुतीत कशी चालली आहे? “तीन चाकी रिक्षा” म्हणजे काय?
उत्तर: महायुती ही भाजप-शिंदे सेना-अजित पवार गट अशी तीन पक्षांची सत्ता आहे. आधी भाजप महाविकास आघाडीला “तीन चाकी रिक्षा” म्हणून चिडवायचा. आता त्यांच्याच नशिबी असंच सरकार आलंय. अग्रलेख म्हणतो, ही रिक्षा आता भरकटली आहे, नगरपालिका निवडणुकांमुळे आतूनच हाणामाऱ्या सुरू आहेत आणि कधीही खड्ड्यात पडू शकते.
३. प्रश्न: नगरपालिका निवडणुकांनंतर शिंदे गटाचं काय होईल?
उत्तर: अग्रलेखाचा दावा आहे की, या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात खूप काही घडेल. भाजपने शिंदे गटाची पुरती कोंडी केली आहे. रवींद्र चव्हाणांनी तर “सुपारी” घेतली आहे. शिंदे गट हा भाजपने तयार केलेला आहे, पण आता भाजप त्यांचे किमान ३५ आमदार गिळून टाकेल आणि ढेकर देईल. शिंदे गटाचे शहाजी पाटील म्हणतात, “आमच्या नशिबी भाजपची गुलामीच आली आहे.” म्हणजे शिंदे गटाला मोदी-शाह आपले वाटतात हा फक्त भ्रम आहे, भाजप कोणाचाच नाही!