Akola News अकोला : अकोल्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आठवले गटाचा अकोला महानगराध्यक्ष आणि कुख्यात गुन्हेगार गजानन काशिनाथ कांबळे (Gajanan Kamble) याला अकोला पोलिसांनी अटक केली आहे. कांबळे याच्यावर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी अकोला जिल्हा (Akola Crime News) कारागृहात स्थानबद्ध केलंय. गजानन कांबळे (वय 49 ) हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तसेच अनेक राजकीय आणि अधिकाऱ्यांशी त्याचे संबध असल्याने गुन्हेगारी आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई
अकोला पोलिसांचा प्रतिबंधक कारवाईवर चांगलाचं जोर वाढला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता अकोला पोलिसांनी थेट सराईत गुन्हेगारांना एका वर्षासाठी तुरुंगाचा मार्ग दाखवला आहे. अकोला पोलिसांनी गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील 6 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केलीय. या सर्वांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलंय.
अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आणि रिपाइं आठवले गटाचा अकोला महानगराध्यक्ष गजानन कांबळे याला विविध गंभीर गुन्हात सक्रिय असल्याने एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. कांबळे याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम न झाल्याचे दिसून आले. प्रतिबंधक कार्यवाही करून सुद्धा कायद्याला जुमानत नसल्याने पोलिसांनी कांबळे विरूध्द गंभीर दखल घेतली आहे. कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या कांबळे याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता अकोला पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांना एक वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
गंभीर गुन्हे दाखल
बलात्कार, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापतीची भीती घालणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दूखापत पोहचविणे, फसवणूक करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवून दंगा करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करण, असे बरेच गंभीर गुन्हे गजानन कांबळे याच्यावर दाखल आहेत.
गजानन कांबळे रामदास आठवलेंचा निकटवर्तीय
गजानन कांबळे हा रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा निकटवर्तीय आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून तो आठवलेंच्या पक्षाचा अकोला महानगराध्यक्ष आहे. खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतरही आठवलेंनी त्याला पदावरून दूर केलं नाही. 2017 मध्ये गजानन कांबळेच्या पत्नीला आठवले गटाकडून महापालिकेचं तिकीट मिळालं होतं. मात्र, त्या यात पराभूत झाल्या होत्या.
रामदास आठवले यांनी गजानन कांबळेच्या मुलाच्या लग्नाला देखील उपस्थिती लावली होती. गजानन कांबळेवर या आधी खून, खंडणी, मारहाणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी झालेल्या सुनिल धोपेकर हत्याकांडात गजानन कांबळे हा मुख्य आरोपी होते. अकोला शहरातील वाशिम बायपास परिसरात कांबळेचं मोठं प्रस्थ आहे. या भागातल्या गुन्हेगारी जगतातही गजानन कांबळेचा यांचा दबदबा असल्याचे बोलले जाते.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..