Devendra Fadnavis on Rahul Gandhi: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला असून, महाराष्ट्रात मतदार यादीत 40 लाख संशयास्पद मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांत वाढले नाहीत तितके मतदार गेल्या 5 वर्षात वाढले आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं असून त्यांची चिप चोरीला गेली आहे आणि हार्डडिस्क करप्ट झाली असल्याचं म्हटलं आहे. 

राहुल गांधींनी मतांची चोरी झाल्याचा आरोप केल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं सांगायचं तर मतांची चोरी ना महाराष्ट्रात, ना भारतात कुठे झाली आहे. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली आहे आणि त्यांची हार्डडिस्क करप्ट झाली आहे. म्हणून त्याच गोष्टी रोज बोलतात. रोज खोटं बोलतात, पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात”.

“मागच्या वेळी महाराष्ट्रात 75 लाख मतदार वाढल्याचं म्हणाले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी मतदार वाढले. दरवेळी काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आता आपली जमीन संपली असल्याचं समजलं आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही. बिहारमध्येही निवडून येणार नाहीत. म्हणून हे कव्हर फायरिंग आहे,” असा आरोप त्यांनी केला. 

“माझा एक प्रश्न आहे की, तुम्ही वारंवार मतदारयादीत गोंधळ आहे म्हणता. मग जर निवडणूक आयोगाने बिहारच्या यादीची व्यापक सुधारणा सुरु केली आहे तर त्याला विरोध का आहे? कित्येक वर्षी आम्ही व्यापक सुधारणेची मागणी करत आहोत. 2012 साली तर मी याचिका केली आहे. मग सुधारणा होणार कशी? आपल्या कायद्यात काय आहे? निवडणूक आयोगाने पुनरावलोकन करणं हेच महत्त्वाचं आहे. त्यालाही विरोध करायचा आणि मतदार यादी खराब असल्याचंही म्हणायचं. एका प्रकारे भारताच्या आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत, त्यावरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, लोकशाही प्रक्रियांवरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे आणि अराजक झालं पाहिजे अशी त्यांची मानसिकता दिसत आहे. कारण त्यांना पुढे पक्षाचं भविष्य दिसत नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे. 

‘एकाच पत्त्यावर 46 मतदार’

संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अचानक मतदानाची संख्या वाढली. पोलिंग आणि ओपिनियम पोलमध्ये डाटा वेगळा दिसतोय मात्र निकाल वेगळाच आहे. वोटर लिस्टमध्ये एका पत्त्यावर 46 मतदार सापडले असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

‘एक लाखांहून अधिक मतांची चोरी’

मतदार यादीत बोगस नावं जोडण्यात आली आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. त्यांनी कर्नाटकची मतदार यादी दाखवत दावा केला की, बंगळुरूमध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात मतांची मोठ्या प्रमाणात चोरी झाली झाली. महादेवपुरा क्षेत्रात 6.5 लाख मतांमध्ये एक लाखाहून अधिक मतांची चोरी झाली आहे असंही त्यांनी सांगितलं. 

‘एका व्यक्तीची चार मतदार कार्ड’

एका व्यक्तीने चार वेगवेगळ्या ठिकाणाचे मतदार कार्ड बनवण्यात आले. एकच मतदार तीन राज्य कर्नाटक, महाराष्ट्र आणि यूपीमध्ये रजिस्टर करण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

 

FAQ

1) राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर कोणते आरोप केले आहेत?

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीत 40 लाख संशयास्पद मतदारांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की, गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात जोडलेल्या मतदारांची संख्या गेल्या पाच वर्षांतील वाढीपेक्षा जास्त आहे. तसेच, एकाच पत्त्यावर ४६ मतदार, एका व्यक्तीची चार मतदार कार्डे आणि एकच मतदार कर्नाटक, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात नोंदवले गेल्याचा आरोप केला.

2) राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याचा दावा कसा केला?

राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात ६.५ लाख मतांपैकी १ लाखाहून अधिक मतांची चोरी झाल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, संध्याकाळी ५ वाजल्यानंतर मतदानाची संख्या अचानक वाढली आणि पोलिंग व ओपिनियन पोलच्या डेटापेक्षा निकाल वेगळे आले.

3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना काय उत्तर दिले?

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना खोडून काढताना म्हटले की, मतांची चोरी झालेली नाही. त्यांनी राहुल गांधींची “चिप चोरीला गेली आहे आणि हार्डडिस्क करप्ट झाली आहे” अशी टीका केली. तसेच, राहुल गांधी रोज खोटे बोलतात आणि सनसनी निर्माण करण्यासाठी वेगवेगळे आकडे देतात, असा आरोप केला.





Source link