Akola News अकोलाराष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या (Sharad Pawar) नव्या तुतारी चिन्हाचं लोकार्पण करण्यात आलं. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडावरच्या सदरेवर हा सोहळा संपन्न झाला. मात्र, या तुतारीवरुन आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. आमदार मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाडांना थेट चॅलेंज देत, त्यांनी तुतारी वाजवून दाखवावी आणि 1 लाख रुपयांचं बक्षीस घेऊन जावं, असे मिटकरी म्हणाले होते. मिटकरींनी दिलेले चॅलेंज आव्हाडांना स्वीकारले आणि ते चॅलेंज पूर्ण देखील केले. मात्र त्यातही मिटकरींनी चूक दाखवली आणि ही चूक दाखवताना ते स्वत:च चुकले असल्याचे समोर आले.

जितेंद्र आव्हाडांसाठी लिहिलेल्या धनादेशावर मिटकरी यांनी चेकवरील नावाच्या रकाण्यात नाव, तर नावाच्या रकाण्यात रक्कम लिहिल्याची चूक घडली होती. यावरून ट्रोलर्सनी अमोल मिटकरी यांना चांगलेच ट्रोल केल्याचे बघायला मिळाले. यावर आता आमदार अमोल मिटकरी यांनी अशा ट्रोलर्सना खडे बोल सुनावले आहे. सोबतच त्यांनी जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

मी आव्हांडासारखे रोज चेक घेत नाही – अमोल मिटकरी

यावेळी ते म्हणाले,  मी गरीब कुटुंबातील माणूस आहे. मला चेक लिहण्याची फार सवय नाही. शिवाय आपण आव्हांडासारखे रोज चेक घेत नसल्याने आपल्याला ती सवय नाही.आता रिकाम्या ट्रोलर्सना काही कामधंदा राहिलेला नसल्याचे देखील मिटकरी म्हणालेय. पुढे बोलतांना ते म्हणाले, जितेंद्र आव्हाडांना दिलेले चॅलेंज त्यांनी पूर्ण केलेले नाही. ते फक्त तुतारी वाजविण्याचं नाटक करत होते. तुतारी वाजवितांना पोट आतमध्ये जात असतं, मात्र आव्हाडांचे पोट बाहेर होतं. तो आवाज आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या तुतारीचा नसून मागच्या तुतारी वादकांचा असल्याचे म्हणत अमोल मिटकरी यांनी हा दावा फेटाळून लावत परत एक नवे आव्हान दिले आहे.  महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 तारखेपासून मुंबईत विधान भवनात पार पडत आहे. त्यांनी पहिल्या दिवशी स्वतः तुतारी आणावी. पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा एक लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांकडून, ज्याला अजित पवार यांनी 50 हजार रुपये महिन्यावर ठेवल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात, त्यांनी माझा दोन महिन्याचा पगार घेऊन जावा”, असं अमोल मिटकरी यांनी परत जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले आहे.

जेवढं तुमचे आयुष्य, तेवढा पवार साहेबांचा राजकीय अनुभव

दरम्यान, तुतारी चिन्हावरून शरद पवारांवर अश्लाघ्य शब्दात टीका करणाऱ्या सदाभाऊ खोतांनाही मिटकरींनी सुनावलंय. खोतांनी तोंडाला आवर घालावा, असा सल्ला त्यांनी दिलाय.  सदाभाऊ खोतांनी केलेलं वक्तव्य माणुसकीला शोभणारे नाही. पवार साहेब हे देशाचे आणि राज्याचे फार मोठे नेते आहेत. जरी साहेबांसोबत आज आम्ही नाही, पण साहेब आमच्या हृदयात आजही आहे. तुमचे आयुष्य जेवढं आहे तेवढा  पवार साहेबांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे बोलतांना जरा मर्यादा राखली पाहिजेल, असा सल्ला देखील अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांना दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link