Farmer Loan Waiver: लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा असा टोला खासदार अमोल कोल्हेंनी लगावला.. त्यानंतर कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधकांनी पुन्हा महायुती सरकारला घेरलंय. 

महायुतीचं सरकार सत्तेत येऊन 5 महिने उलटून गेलेत. मात्र महायुतीनं जाहीरनाम्यात दिलेलं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन अजून पूर्णत्वास गेलेलं नाही. उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवारांपासून कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी कर्जमाफीचा निर्णय लांबणार असल्याचीच वक्तव्य आजवर केलीयत. आता पुन्हा एकदा याच कर्जमाफीच्या मुद्दयावरुन विरोधकांनी महायुती सरकारला घेरलंय. लाडक्या बहिणींची तर काळजी घ्या मात्र लाडक्या दाजींना दिलेलं कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करा असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लगावलाय. 

दुसरीकडे नाशकात झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीही महायुतीला त्यांच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांची आठवण करुन दिली. महायुतीनं जाहीरनाम्यात थापा मारल्याचा आरोपच ठाकरेंनी केला. मागच्या सरकारमध्ये महायुतीसोबत असलेले बच्चू कडूंचे महायुतीसोबतचे संबंध कडू झाले आणि ते महायुतीतून बाहेर पडले. मात्र आता त्याच बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 28 तारखेला आंदोलनाची हाक दिलीय आणि महायुतीला शिंगावर घेतलंय. 

नाशिक जिल्ह्यातच शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं शासन विरोधी जोरदार आंदोलन करत विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्याची होळी केली. सरकारला त्यांच्याच आश्वासनांची आठवण करुन देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. 

लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीसारख्या आश्वासनांच्या जोरावर महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र सरकारी तिजोरीत खडखडाट असल्यानं कर्जमाफीवरुन सरकार टोलवाटोलवी करतंय. तर शेतकऱ्यांनाही कर्जमाफीसाठी न थांबता हप्ते बरा असं स्वत: अर्थमंत्री अजित पवार सांगताहेत. त्यामुळं ज्या आश्वासनांच्या जोरावर सत्तेत आले त्या आश्वासनांचं भूत आता महायुतीच्या मानगुटीवर बसलंय. आणि ते भूत सध्या विरोधकांच्या तोंडून प्रश्न विचारून महायुतीच्या विक्रमाला बेजार करु लागलंय.





Source link