Lok Sabha Election Result 2024 : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप्रणित (BJP) आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची (MVA Alliance) 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) कायम राहिला तर महायुतीची सत्ता जाणे अटळ आहे.
लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर
दुसरीकडे विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने (Congress) घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. असे असले तरी काही मतदारसंघातील पराभवानंतर काँग्रेस अॅक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळाले आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसपक्ष नेतृत्वाने संघटनात्मक स्तरावर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. याची सुरवात आज अकोल्यातून झाली आहे.
प्रदेश काँग्रेसच्या सचिवाचे सहा वर्षासाठी निलंबन
अकोला लोकसभेतील पराभवानंतर अकोल्यातील पक्षविरोधी कारवायांवर काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे यांचे पक्ष आणि पदावरून निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी गावंडे यांना निलंबीत करण्यात आले आहे. काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्याविरोधात वंचितचे सर्वेसर्वा आणि अकोला मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे असलेल्या प्रकाश आंबेडकरांचं निवडणुकीच्या काळात काम केल्याचा ठपका गावंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.परिणामी पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत प्रशांत गावंडे यांच्यावर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचा आदेश आज बुधवार, 12 जून रोजी प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे (प्रशासन व संघटन) यांनी काढला आहे.
कोण आहेत प्रशांत गावंडे ?
- प्रशांत गावंडे हे सध्या प्रदेश काँग्रेसचे सचिव पदावर कार्यरत आहेत.
- काँग्रेस पक्षात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे.
- अकोल्यातील सर्वपक्षीय ‘शेतकरी जागर मंच’ या गैरराजकीय शेतकरी आंदोलनाचे ते संस्थापक आहेत
- पाच वर्षांपूर्वी भाजपचे तत्कालिन जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी शेतकरी जागर मंचाच्या व्यासपीठावरून केलेलं शेतकरी आंदोलन देशभर गाजलं होतं.
- गावंडे यांचा काँग्रेसच्या राहूल गांधी, सोनिया गांधी, मुकूल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला या नेत्यांशी थेट संपर्क आहे.
- अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे यांचे कट्टर विरोधक अशी ओळख त्यांची ओळख आहे.
- ‘महाबीज’ संचालक पदाच्या निवडणुकीत संजय धोत्रेंना त्यांनी तगडं आव्हान दिले होते. मात्र त्यावेळी त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता.
- अकोला लोकसभेसाठी त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती.
- काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर अकोला लोकसभेत त्यांनी आंबेडकरांचं काम केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..