Vidarbha Weather Update नागपूर : हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha) मान्सूनपूर्व पावसाने एकच दाणादाण उडावल्याचे बघायला मिळाले. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. यात अनेकांच्या घरांवरची छत उडून गेली आहेत, तर अनेक ठिकाणी मोठे झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक आणि विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. तर पूर्व विदर्भात हजारो क्विंटल धान पावसात अक्षरक्ष: ओले होऊन लाखोंचे नुकसान झाले आहे.
तर आगामी चार दिवसात विदर्भात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. आज देखील विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, वर्धा, गोंदिया इत्यादि ठिकाणी दमदार पावसाने सलग हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून वाढलेले तापमान आणि उकड्यामुळे पुरते हैराण झालेल्या वैदर्भीयांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
वादळीवाऱ्याने चक्क पोलीस ठाण्याचे छप्परच नेले उडवून
तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळामुळे यवतमाळच्या वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे छप्पर पूर्णपणे उडून गेले. त्यामुळे या ठाण्याचा सद्यस्थितीतील कारभार या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कापडी टेंट मधून चालविण्यात येत आहे. वादळाच्या तडाख्यात इमारतीवरील टिनाचे छप्पर अक्षरक्ष: उडाल्याने संगणक आणि इतर कागदपत्रे पावसाने ओली झाली होती. छप्पर उडल्याने पोलीस ठाण्याचे कामकाज कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी, ठाणेदारांच्या कॅबिनमध्ये स्टेशन डायरी आणि वायरलेसची व्यवस्था करण्यात आली. तर ठाणेदारांना कामकाज सांभाळण्यासाठी समोरील मैदानात पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून टेंट उभारून देण्यात आला आहे. तर नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणची पाहनी केली असून सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी दिवसात या पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्याच्या उपाययोजना सुरू करण्यात येणार आहे. मात्र अद्याप तरी या पोलीस ठाण्याचा कारभार कापडी टेंटमधूनच होत असल्याचे समोर आले आहे.
विदर्भात सलग कोसळत असलेल्या पावसाने वैदर्भीयांना दिलासा
सलग दुसऱ्या दिवशीही बुलढाण्यात मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. काही वेळ कोसळलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे सलग पडत असलेल्या पावसाने शेतकरीही सुखावलाय. त्यामुळे आगामी दोन दिवसात खरिपाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी दोन दिवसाचा अवधी उरला असला तरी वाशिम जिल्ह्यातही आज सलग पाचव्या दिवशी अनेक भागात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजाच्या शेतातील कामांना आणि पेरणीना वेग येणार असल्याचे चित्र निर्माण झाला आहे.
अकोल्यातही आज मान्सून पूर्व पावसासह जोराच्या वादळी वाऱ्याने हजेरी लावली आहे. अकोला शहरासह ग्रामीण भागात जोरदार वारा आणि पाऊस पडतो आहे. अकोल्यात वाढत्या तापमानामुळे अकोलेकर चांगलेच हैरान झाले होते. मात्र आज सायंकाळच्या पावसानं अकोलेकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..