अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी आता वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) ‘ॲक्शन मोड’वर आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून बुधवारी रात्री निवडणूक आणि समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक समितीत भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने आणि वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पूंडकर हे सहअध्यक्ष असणार आहेत. हे दोघे समन्वय समितीचेही सदस्य असणार आहेत. तर दोन्ही समित्यांच्या इतर सदस्यांमध्ये अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, गोविंद दळवी आणि सोमनाथ साळुंखे यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी या दोन्ही समित्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
निवडणूक आणि समन्वय समिती ‘वंचित’ कडून निवडणूक लढवण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी उमेदवारांची तपासणी केली जाणार आहे. यासोबतच या दोन्ही समित्या उमेदवाराबद्दल अंतिम निर्णय घेणार आहेत. दोन्ही समित्या निवडणूक प्रचाराच्या तयारीची देखरेख करणार आहे. सोबतच मीडिया समिती, संशोधन विभाग आणि राज्य कोअर कमिटी यांच्याशी समन्वय साधण्याचं कामही या दोन्ही समित्या करणार आहेत.
वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर निवडणूक आणि समन्वय समितीच्या ‘कॅप्टन’ :
विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ‘निवडणूक समिती’ ही सर्व शक्तिमान समिती समजली जाते. राज्य आणि प्रत्येक मतदारसंघातील पक्षाची रणनीती, उमेदवारांचे आलेले अर्ज, त्यांची छाननी आणि अंतिम उमेदवारी हे सर्व निर्णय ही समिती घेणार आहे. त्यामुळे या समितीतील नियुक्त्यांकडे वंचित बहुजन आघाडीसह सर्वच राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागले होते. प्रकाश आंबेडकरांनी या समितीच्या अध्यक्षपदी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची नियुक्ती करीत त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे या समितीत रेखा ठाकूर यांच्या मदतीला भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच पक्षाच्या समन्वय समितीत या तिघांनाही नेमण्यात आलं आहे. समन्वय समितीच्या अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर याच असणार आहेत. तर अशोक सोनोने आणि डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे समन्वय समितीचेसुद्धा सदस्य असणार आहेत. याबरोबरच दोन्ही समित्यांच्या सदस्यपदी अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, गोविंद दळवी आणि सोमनाथ साळुंखे यांचा समावेश करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडी निवडणूक समिती :
नाव जबाबदारी
रेखा ठाकूर अध्यक्ष
अशोक सोनोने सहअध्यक्ष
डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सहअध्यक्ष
अरुण जाधव सदस्य
दिशा पिंकी शेख सदस्य
गोविंद दळवी सदस्य
सोमनाथ साळुंखे सदस्य
वंचित बहुजन आघाडी समन्वय समिती :
नाव जबाबदारी
रेखा ठाकूर अध्यक्ष
अशोक सोनोने सदस्य
डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सदस्य
अरुण जाधव सदस्य
दिशा पिंकी शेख सदस्य
गोविंद दळवी सदस्य
सोमनाथ साळुंखे सदस्य
समन्वय समितीतील प्रत्येकाकडे कोणकोणत्या जिल्ह्यांची जबाबदारी :
समन्वय समितीच्या अध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडे नागपूर, लातूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या समन्वयाची जबाबदारी असेल. तर समितीचे सदस्य असलेले भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्याकडे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांच्या समन्वयाची जबाबदारी असेल. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडे बुलढाणा, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यांची जबाबदारी असेल. अरुण जाधव यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यांची जबाबदारी असेल. समितीच्या सदस्य दिशा पिंकी शेख यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांची जबाबदारी असेल. वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष आणि समितीचे सदस्य असलेल्या गोविंद दळवी यांच्याकडे मराठवाड्यातील नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर सोमनाथ साळुंखे यांच्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
याबरोबरच समन्वय समितीच्या कोणत्याच सदस्यांकडे जबाबदारी न दिलेल्या बीड, जालना, धाराशिव, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांची जबाबदारी वंचितच्या प्रदेश समितीकडे असेल. या जिल्ह्यांचा समन्वय प्रदेश समिती आणि त्या जिल्ह्यांची समिती मिळून करणार आहे.
वंचितमध्ये रेखा ठाकूर, अशोक सोनोने आणि डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांचं राजकीय ‘वजन’ वाढलं!.
संपूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या या दोन्ही समित्या महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. त्यामुळे लोकसभेतील दणदणीत पराभवानंतर या समित्या पक्षाच्या पराभवाचा भूतकाळ पुसून काढणार का?, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. निवडणूक आणि समन्वय समितीत प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना अध्यक्ष नेमत आंबेडकरांनी पक्षातील ठाकूर यांच्या विरोधकांना ‘मॅसेज’ दिला आहे. यासोबतच पक्षाची ‘थींक टॅंक’ म्हणून ओळखले जाणारे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे निवडणूक समितीचे सहअध्यक्ष तर समन्वय समितीचे सदस्य असणार आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यातील पक्षाचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांना डॉ. पुंडकरांप्रमाने दोन्ही समित्यांत स्थान देण्यात आलं आहे. तर दोन्ही समित्यांच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेल्या अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, गोविंद दळवी आणि सोमनाथ साळुंखे यांचंही पक्षातील वजन आणखी वाढलं आहे.
दोन्ही समित्यांमध्ये आंबेडकरांचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ :
प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला ‘अकोला पॅटर्न’ ओळखला जातो तो त्यांच्या राजकारणातील जातीय समतोलासाठी. पुढे याच ‘अकोला पॅटर्न’ला ‘सोशल इंजिनिअरिंग’ या नावाची नवी ओळख मिळाली. समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य निवडतांना आंबेडकरांनी सर्व समाज घटकांना त्यात सामावून घेत सामाजिक आणि जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासी, बौद्ध, मराठा या मोठ्या समाज घटकांसह न्हावी आणि तृतीयपंथी अशा लहान समाज घटकांनाही या समित्यांमध्ये त्यांनी स्थान दिलं आहे. या दोन्हीही समित्या स्थापन करून वंचितने एकप्रकारे विधानसभा निवडणुकीच्या तयारीचं बिगुल वाजविलं आहे.
अधिक पाहा..