Asaduddin Owaisi targets Amit Deshmukh: भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अमित देशमुखांनी वारशावरुन अमित देशमुखांवर निशाणा साधला आहे. मी वारसा नाही, काम सांगतो म्हणत ओवेसींनी अमित देशमुखांना जाहीर आव्हानच दिलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

“मीदेखील मोठ्या बापाचा मुलगा आहे, माझे वडील सहा वेळा आमदार होते. पण मी त्यांचा वारसा सांगत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे जनतेसमोर मांडतो,” असा हल्लाबोल एमआयएमचे नेते तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांच्यावर केला आहे.

“लातूर शहरातील मूलभूत समस्या आजही जैसे थे असल्याने, केवळ वारसा सांगून राजकारण करण्याची प्रथा आता सुरू झाली आहे. मोठमोठ्या राजांचे महाल ओसाड पडले, मग तुम्ही कोणता वारसा सांगता?,” असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे. 

रवींद्र चव्हाणांनी काय म्हटलं आहे?

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अधिकच तापू लागला आहे. प्रचाराच्या धामधुमीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील असं वक्तव्य चव्हाण यांनी केल्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. 

वादानंतर व्यक्त केली दिलगिरी

मी विलासरावांवर टीका टिप्पणी केली नाही. ते मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. विलासरावांवर लक्ष्य केंद्रीत करुन काँग्रेस तिथं मत मागत आहे, म्हणून आम्ही मोदींचे काम पाहा म्हटले. तरीसुद्धा त्यांच्या चिरंजीवांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. राजकीय दृष्टीने पाहू नका असं नंतर त्यांनी म्हटलं .

देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करताना म्हटलं की, “रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, स्पष्टीकरण ही दिले आहे. विलासराव यांच्याबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर आहे, त्यांच्या स्मृती पुसल्या जाणार नाहीत. कुणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही त्यांनी  केलं आहे”.

जयंत पाटलांकडून वक्तव्याचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध केला. स्व. विलासराव देशमुख साहेब यांची कारकीर्द राजकारणात येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी होती. आपल्या महाराष्ट्राने जो काही विकास साधला आहे, त्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी स्व. विलासराव देशमुख यांची आठवण कधीही पुसली जाणार नाही, त्यांनी लातूर-महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले योगदान कधीही विसरले जाणार नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

जयंत पाटील म्हटले की, कोणी काहीही म्हटले तरी एका व्यक्तीने पेरलेले विचार आणि त्यांनी केलेली कामे कधीही पुसली जावू शकत नाही. विचार पटत नाही म्हणून महात्मा गांधींचीही हत्या केली गेली पण गांधींचा विचार आजही जिवंत आहे, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान पुसले जाऊ शकत नाही.





Source link