लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर : शनि शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितिन शेटे यांनी आपलं जीवन संपवलंय. मागील काही दिवसांपासून शनि शिंगणापूर देवस्थानच्या गैरकारभाराची चौकशी सुरू आहे. चौकशीच्या कारणामुळे नितीन शेटे यांनी हे टोकाचं पाऊल उचललल्याची चर्चा सुरू आहे.

 शनी शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केली आहे. नितीन शेटे यांनी घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. नितीन शेटे हे 2021 पासून शनी शिंगणापूर देवस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सध्या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या कारभारासंदर्भात चौकशी सुरू आहे. आणि याच चौकशीमुळे शेटे यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

सध्या देवस्थानच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या बनावट ऑनलाईन अँप प्रकरणी शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अनेक पदाधिकाऱ्यांचे आणि पुजाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. मात्र, नितीन शेटे यांना या चौकशीसाठी कधीही पोलिसांनी बोलावले नव्हते किंवा त्यांना समन्सही बजावण्यात आले नव्हते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

 तर या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.. आणि मुख्यमंत्रीत्र्यांनी शनी शिंगणापूरच्या गावकऱ्यांना देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी असी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. 

 शनी शिंगणापूर देवस्थानच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असतानाच माजी विश्वस्ताने आत्महत्या केल्यानं या दोन्ही घटनांचा संबंध जोडला जातोय. मात्र असं असलं तरी या प्रकरणात नितीन शेटेंची कोणताही चौकशी करण्यात आली नसल्याचं पोलिसांनीहच स्पष्ट केलंय.. त्यामुळे आता या आत्महत्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केलीय. यातून काय समोर येतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे..

 





Source link