Vijay Wadettiwar on MNS: मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मनसेशी आमची विचारधारा जुळत नाही. मात्र भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज असल्याचं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलं आहे. भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक असून मनसेला सोबत घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. शरद पवार या आघाडीला घेऊन सकारात्मक असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. शरद पवारांनी मोर्चात एकत्र, निवडणूक वेगळी का लढवता? अशी विचारणा केली होती. महाविकास आघाडी म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजे असं स्पष्ट मत शरद पवारांनी मांडलं होतं. 

Add Zee News as a Preferred Source

“मनसेची आणि आमची विचारधारा जुळत नाही. त्यामुळे तो विषय आला असावा. पण शरद पवारांनी आपण आघाडीत लढलं पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. आपण सर्वांनी भाजपाचा पराभव करण्यासाठी, या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दरम्यान दडपशाही करणा-यासंबोत काँग्रेस जाणार नाही असं वक्तव्य काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी दिली होती. महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र वडेट्टीवारांनी मात्र भाजप विरोधात मनसेला सोबत घेण्यास सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. त्यामुळे मनसेवरुन काँग्रेसमध्ये दोन प्रवाह असल्याचं समोर येत आहे. 

वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं, “मुंबई एक असं शहर आहे जिथे सर्व राज्यातील लोक असतात आणि मुंबईच्या विकासात प्रत्येकाचा हातभार आहे. त्यामुळे दडपशाही करणाऱ्या किंवा कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही”.

शरद पवारांनी काय म्हटलं?

मुंबईत मनसे पक्षाला सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक आहेत. महाविकास आघाडी म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली पाहिजे असं शरद पवार यांचं मत आहे. मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता? असा स्पष्ट मत शरद पवारांनी मांडलं आहे. 

शरद पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना फोन 

शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन केला होता. मुंबई महानगरपालिका कशी लढायची  यावरती सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदील दिला होता. मात्र शरद पवार काँग्रेस सोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी म्हणून नव्याने आणखी काही प्रयत्न करणार यावरती स्पष्टता नव्हती. 





Source link