Close Leader of Eknath Shinde Will Join BJP Says Sanjay Raut: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधून एक बडा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याचं भाकित केलं आहे. आज पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या मुद्द्यापासून ते आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमधील सत्ताधाऱ्यांच्या प्रचार दौऱ्यांवरुनही निशाणा साधला आहे. राऊत यांनी नेमका कोणता नेता भाजपामध्ये जाणार आहे याबद्दल काय म्हटलं आहे जे जाणून घेऊयात…
‘शिंदे सेनेला बाळासाहेब वंदनीय नाहीत, त्यांना…’
शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेकवांची गट नोंदणी होत असल्याच्या मुद्द्यावरुन राऊतांनी, “बाळासाहेब ठाकरे त्यांना अजिबात वंदनीय नाहीत. मोदी, शहा त्यांना वंदनीय आहेत. बाळासाहेब म्हणजे विचार आणि पुढे गेले असते. मुंबई तोडण्याची कारस्थाने सुरू आहेत. बाळासाहेब वंदनीय आहेत हा बाळासाहेबांचा मराठी जनांचा अपमान करण्यासारखं आहे,” असं म्हटलं आहे.
किती रुसून रुसून रुसणार?
“शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती रुसून रुसून रुसणार? काहीतरी साडी चोळी पदरात पाडून घेईल. महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होईल. मुंबईवर ताबा मिळविण्याचं काम करतील आणि अडीच वर्षानंतर वगैरे काही मिळणार नाही,” असं राऊत म्हणाले.
जिल्हा परिषद निवडणूक प्रचारावरुन टोला
“जिल्हा परिषद निवडणुका नेते लढत नाहीत. जिल्ह्यातले स्थानिक प्रमुख नेते लढतात. त्यांना काम काय आहे? त्यांना मंत्रालयात बसून राज्याचा कारभार करायचे आहे पण ते करतात का? पण ते 24 तास राजकारण आणि निवडणुकांत गुंतले आहेत,” असा टोला राऊत यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारा दौऱ्यावरुन लगावला आहे. “आमच्या कार्यकर्त्यांना कसं बळ द्यायचं ते आमच्यावर सोडा. आम्ही पक्षाचा बळी देऊ शकत नाही. ते 50 सभा घेतील त्यांना काम काय आहे त्यांच्याकडे चार्टर्ड प्लेन आहे. हेलिकॉप्टर आहे. पैशाने भरलेले कंटेनर आहेत. राज्याचं हिताचं एक तरी काम केलं आहे का? निवडणुका लढवणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं ही त्यांची लोकसेवा आहे,” असा टोला राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
हा नेता शिंदेंना सोडून जाणार
उदय सामंत हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील असं भाकित संजय राऊत यांनी केलं आहे. “स्वतः उदय सामंत भाजपात चालले आहेत. दावोसमध्ये काय चाललंय तुम्हाला माहिती आहे का?” असा सवाल राऊतांनी केला आहे.