Akola Car Accident वाशिम : अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील उड्डाण पुलाजवळील शिगर नाल्याजवळ हा अपघात झालाय. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले असून काही जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गाडीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात असल्याची माहिती पुढे आली आहे. वाशिमवरून अकोलाकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चार चाकी गाडी आमने-सामने आल्याने जोरदार धडक झाली. हा अपघात ऐवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

दोन्ही वाहनांचा अक्षरक्ष: चुराडा

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आमदार किरण सरनाईक यांचे बंधू अरुण सरनाईक यांचा मुलगा रघुवीर सरनाईक, शिवानी सरनाईक (आमले) यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोला जिल्ह्यातील आसटूल गावातील कपिल इंगळे आणि ठाकरे या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. तर मृतक शिवानी सरनाईक यांची मुलगी अस्मिरा आमले आणि अधिक काही जणांसह काही गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्याघडीला जखमींना अकोला येथे उपचार्थ हलविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोन्ही वाहनांचा अक्षरक्ष: चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. तर पुढील कारवाई पोलीस करत असून या घटनेचा अधिक तपास सध्या सुरू आहे. 

दोन चारचाकीचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार, तीन जखमी 

असाच एक अपघात वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यात साळंबी गावा लगत दिग्रस-अकोला महामार्गावर झाला आहे. यात दोन भरधाव चारचाकी वाहन आमोर-सामोर आल्याने हा अपघात झालाय. या अपघातात दोन जण ठार झालेत. तर एकजण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मेहकरकडून मानोराकडे लग्न समारंभासाठी निघालेल्या एका चार चाकी वाहनाला समोरून येणाऱ्या चार चाकी वाहनाची धडक लागल्याने दोन्ही गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये लग्नासाठी जाणाऱ्या तीन पैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. तर दुसऱ्या गाडी मधील दोन जण किरकोळ जखमी झालेत. 

हा अपघात इतका भीषण होता की एक गाडी थेट रस्त्याच्या कडेला जाऊन खालच्या बाजूला जाऊन कोसळली. तर दुसऱ्या गाडीचा अक्षरक्ष: चुराडा झालाय. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव मेहकर येथून ही मंडळी मानोराकडे लग्नाकडे जात असल्याची प्राथमिक माहिती हाती आलीय. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्य सुरू केलं. तर जखमींना तत्काळ रुग्णवाहिका पाचारण करून जखमी उपचारासाठी  हलवण्यात आलंय.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link