Vidarbha Weather Update नागपूर : राज्यात सर्वत्र उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठत आहे. असे असतानाच मे महिन्याच्या अखेरीस विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावत एकच दाणादाण उडवली आहे.
यात पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काल सायंकाळी अचानक चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाच्या (Unseasonal Rain) धारा बरसल्या. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक गावात मोठे झाडे उन्मळून पडली असल्याने विजपुरवठाही खंडित झाला आहे. परिणामी नारिकांना रात्र अंधाऱ्यात काढावी लागली आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे अक्षरशः उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
घरावरील पत्रे अन् सौर पॅनलही उडाले
काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या सोसाट्याच्या वादळी वारा आणि पावसाचा तडाखा नवेगावबांध परिसराला बसला आहे. वादळी पावसामुळे अनेक घरांवरील टीन पत्र्याचे छत उडाले. तर काहींच्या घरावर लावलेले सौर पॅनलही उडाले आहेत. तसेच झाडांची आणि विद्युत खांबांचीही पडझड झाली. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटे झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वादळी वारा आणि पावसाचा धानाच्या मळणीला फटका
सध्या या परिसरात रब्बीतील धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी पावसाचा फटका धानाच्या मळणीला बसल्याने धान पिकाचे नुकसान झाले. तर कापणी केलेल्या धानाच्या कडपा सुद्धा पावसामुळे भिजलाय. जोरदार वादळामुळे या परिसरातील अनेक मोठी झाडे उन्मळून पडले आहे. तसेच विद्युत खांबांची पडझड झाली. काहींच्या घरावरील टीन पत्र्याचे छत उडाले, तर काहींनी लावलेले सौर पॅनल उडाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
वादळी वाऱ्यानं शेतातील उभं भातपीक जमीनदोस्त
काल सायंकाळी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं शेतातील कापणीला आलेलं उभं भातपीक अक्षरश: जमीनदोस्त झालं. या वर्षाच्या हंगामातील भंडारा जिल्ह्यात आलेला हा अवकाळीचा सहावा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतबांध्यांमध्ये आत पाणी असल्यानं हे भातपीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. अनेक ठिकाणचे मोठे वृक्ष उन्मळून पडल्यानं वाहतूक प्रभावित झाली होती. तर, काही ठिकाणच्या विद्युत तारा तुटल्यानं रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता.
72 तासांपासून विज पुरवठा खंडित
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा करणारी अनेक खांब तुटले आहेत. परिणामी, मलकापूर परिसरात गेल्या 72 तासापासून विद्युत पुरवठा खंडित आहे. मात्र अद्यापही हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात वीज वितरण कंपनीला यश आलेले नाही. अशातच मलकापूर आणि परिसरात तापमान वाढीमुळे व उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत. तर अद्यापही वीज पुरवठा सुरळीत न केल्यामुळे रात्री आक्रमक नागरिकांनी थेट मलकापूर वीज वितरण कंपनी समोर ठिय्या आंदोलन सुरू केल. अद्यापही हे आंदोलन सुरूच आहे. मात्र याबाबत वीज वितरण कंपनीचे कुणीही अधिकारी या आंदोलनकर्त्याशी बोलण्यास आलेलं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..